उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायामाची गरज आहे , किमान आपण खेळलं पाहिजे , अशी प्रतिक्रिया फाल्कन जिमचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष विरोचन यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.
सुभाष विरोचन पुढे म्हणाले , खेळ व व्यायाम या दोन्ही गोष्टी माणसाला सकारात्मक आयुष्य जगायला शिकवत असतात. नियमित खेळ खेळणारी व्यक्ती जगज्जेती होईलच असं नाही आणि नियमित व्यायाम करणारी व्यक्ती पहेलवान बनून कुस्तीगीर होईलच असं नाही. परंतु व्यायाम व खेळण्यानं शरीरातील स्नायू बळकट होतात. स्नायूंचं परस्परसहकार्य वाढतं. शारीरिक कष्ट व ताण सहन करण्याची त्या व्यक्तीची क्षमता वाढते.
खेळ आणि व्यायामाबद्दल दोन प्रश्न नेहमीच विचारले जातात. पहिला प्रश्न हा की, ‘नियमित खेळानं व व्यायामानं आयुष्य वाढतं का?’ आणि दुसरा- ‘खेळण्यामुळे हृदयविकार टाळता येतो का?’ अभ्यासाअंती या दोन्ही प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आली आहेत. नियमित खेळणं व व्यायाम यामुळे स्नायूंसोबत हृदयाचं आरोग्य सुधारतं. रक्तदाब कमी व्हायला मदत होते. रक्तामधील कोलेस्ट्रॉल कमी होतं. ट्रायग्लिसराईडस् कमी होतात. या दोन्ही घटकांचं प्रमाण वाढलं तर रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या जमून रक्तदाबाचा विकार व हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. रक्तामधील LDL (लो डेन्सिटी लायपोप्रोटिन) नामक रासायनिक पदार्थ कोलेस्ट्रॉलला रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचविण्याचं काम करीत असतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होण्याची क्रिया वेग घेते. रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉल दूर नेण्याचं काम हा रासायनिक पदार्थ करतो. नियमित व्यायामामुळे एच डी एल चं प्रमाण वाढतं आणि एच डी एल चं प्रमाण कमी होतं. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होण्याची प्रक्रिया टाळली जाते. नियमित व्यायाम सुरू राहिला तर शरीरातील धमन्यांची संख्या आणि त्यांचा व्यास वाढतो. त्यामुळे रक्तप्रवाह खंडित होण्याची शक्यता कमी होते.
नियमित व्यायाम करूनही वजन कमी होत नाही, अशी काही मंडळींची तक्रार असते. याचं पहिलं कारण- शरीरातील चरबी कमी होऊन स्नायूंचं प्रमाण वाढल्यामुळे हे घडू शकतं. एक किलो चरबी म्हणजे ७००० कॅलरीज्, २० किलो चरबी म्हणजे शरीराला गरज नसलेल्या १,४०,००० कॅलरीज्. खाण्यावर नियंत्रण ठेवलं गेलं तर नुसत्या चालण्यानं दर मिनिटाला ६ ते ७ कॅलरीज वापरल्या जातात. खेळ आणि व्यायामातून त्या निश्चितपणे कमी होतात. त्याकरिता व्यायामासोबतच आहारावरही नियंत्रण हवं. नियमित व्यायाम व खेळामुळे आयुष्य वाढण्याची शक्यता असते आणि हृदयविकार टाळला जाण्याची शक्यता वाढते, हे शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग करून सिद्ध केलेलं आहे.
नियमित खेळ वा व्यायाम केल्यामुळे काही लोकांना त्यात प्रावीण्य मिळवता येतं. व्यायाम करून काहींचं शरीर घाटदार होतं. व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला आपण निरोगी आहोत, ही आंतरिक भावना समाधान देत असते. या समाधानातूनच सुरक्षिततेची भावना दृढ होऊन सकारात्मक मानसिक आरोग्य घडायला मदत होते. व्यायामाचा स्नायूंवर, हृदयावर, रक्तवाहिन्यांवर, मनावर प्रत्यक्ष परिणाम होत असतोच, पण अप्रत्यक्षरीत्याही अनेक फायदे होतात.
नियमितपणे एखादा खेळ खेळणारी किंवा व्यायाम करणारी व्यक्ती अनेक गोष्टी शिकत असते. अनेक प्रकारचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फायदे मिळवीत असते. ‘तुम्ही धावत राहाल तोपर्यंत तुम्ही विक्रम मोडीत राहाल,’ असं म्हणणारे डॉ. रॉजर बॅनिस्टर हे १९५६ साली धावण्यातील नवा विक्रम करण्यात यशस्वी झाले होते. त्यांनी चार मिनिटांच्या आत एक मैल अंतर धावून पार केलं होतं. नंतर हा विक्रम अनेकदा मोडला गेला, पण त्यांनी उच्चारलेलं वरील वाक्य ही काळ्या दगडावरची रेघ ठरली आहे.
नियमित व्यायाम करणारी व खेळणारी व्यक्ती वेळेचं महत्त्व नीट जाणते. त्यांना वेळेचं नियोजन करणं सोपं जातं. कामं वेळच्या वेळी करण्याची सवय अंगवळणी पडल्यानं कामं राहून गेलीत असं घडतच नाहीत. राहून गेलेली कामं मानसिक तणावाचं कारण ठरू शकतात. ठरलेली कामं लगोलग पूर्ण केली गेली तर आनंद तर मिळतोच, शिवाय सुरक्षिततेची आंतरिक अनुभूतीही मिळते.
खेळातून तयार होणाऱ्या मानसिकतेमध्ये पुढे जाण्याची ऊर्मी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची इष्र्या हा महत्त्वाचा भाग असतो. त्याचा उपयोग जीवनात अनेक प्रकारे होऊ शकतो. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेनिस लिली त्याच्या पाठीच्या मणक्याच्या दुखण्यातून या ऊर्मीमुळेच सावरला होता व कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा नव्या उमेदीनं परत आला होता.
कुठल्याही खेळात अंतिम सामन्यात हरणारी व्यक्ती जिंकणाऱ्याचं अभिनंदन करते आणि जिंकणारी व्यक्ती हरणाऱ्या व्यक्तीला जवळ घेऊन पुढल्या यशासाठी शुभेच्छा देते. ही मानसिकता निरोगी व्यक्तिमत्त्वासाठी अत्यावश्यक असते. यामुळे मिळालेलं यश डोक्यात जात नाही किंवा हरल्याचं दु:खही नाउमेद करीत नाही.
परवाच सचिन तेंडुलकरबद्दल ऐकलं/ वाचलं की, क्रिकेटमधील सर्व विक्रम मोडीत काढणाऱ्या या महान खेळाडूनं आपल्या नव्या घराच्या परिसरातील लोकांची क्षमा मागितली. कशासाठी? तर- घराच्या बांधकामाच्या वेळी होणाऱ्या आवाजाचा शेजारच्यांना त्रास होत होता. आपल्या विजयाचा उन्माद डोक्यात जाऊ न देता नम्रपणानं लोकांच्या भावनांचा आदर करणारा सचिन माणूस म्हणूनही जगज्जेता ठरला. अशी मानसिकता खेळामधूनच येत असते. खेळामुळे देश, धर्म, जातपात याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची मानसिकता तयार होत असते.
दोन देशांमध्ये क्रिकेट सामना सुरू असताना चांगल्या खेळाबद्दल दोन्ही बाजूंच्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जातं. तो आपल्या देशाचा नाही, आपल्या धर्माचा नाही, हा विचार प्रोत्साहन देताना होत नाही. खेळाडू आणि सामना बघणारे प्रेक्षक यांच्यात त्यावेळी एक वेगळाच भावबंध निर्माण होत असतो.
खेळ व व्यायाम एक सदृढ समाज घडवतो,यात समाजाचे सार्वजनिक हित आहे, आपल्या आरोग्यासाठी , निरोगी समाजासाठी व्यायाम आवश्यक आहे , त्यासाठी समाज जागृती करणे गरजेचे असल्याचेच सुभाष विरोचन यांनी नमूद केले.
संकलन : सनी जाधव
कोकण दर्पण .





