नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : ऐरोली विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना-आरपीआय-रयतक्रांती-रासप-शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांना विविध राजकीय पक्ष, संघटना आणि समाज संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत असून या सर्वांनी त्यांच्या विजयासाठी सक्रीय पुढाकार घेतला आहे.
लहुजी शक्ती सेना
मातंग समाजाच्या हितासाठी कार्यरत लहुजी शक्ती सेनेने आपले समर्थन दिले आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णूभाउ कसबे आणि प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भाउ कांबळे यांनी लोकनेते नाईक यांना निवडून देण्याचे आवाहन समाजबांधवांना केले आहे.
खारी-कळवे-बेलापूर विभाग शेतकरी समाज संघटना
खारी-कळवे-बेलापूर विभाग शेतकरी समाज संघटना देखील लोकनेते नाईक यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. संघटनेने अध्यक्ष मोरेश्वर पाटील, सरचिटणीस ऍड. पी. सी. पाटील, उपाध्यक्ष रामभाउ मढवी, खजिनदार तुकाराम पाटील यांनी लोकनेते नाईक यांची भेट घेवून त्यांना पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सुटावेत यासाठी लोकनेते नाईक यांनी पाठपुरावा केलेला आहे. तसेच त्यांच्या संघर्षात त्यांच्या सोबत सदैव सहभागी झाले आहेत.
सोलापूर जिल्हा बहुजन एकता रहिवासी संघ
सोलापूर जिल्हा बहुजन एकता रहिवासी संघाने देखील लोकनेते नाईक यांना पाठिंबा देवून त्यांच्या विजयासाठी मूळ सोलापूरचे रहिवासी एकवटले आहेत. या रहिवासी संघाच्या माध्यमातून दत्तात्रय सावळे यांनी ऐरोली मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी देखील लोकनेते नाईक यांना पाठिंबा देवून आपली उमेदवारी मागे घेतली आहे.
नवी मुंबई कुंभार समाज
लोकनेते नाईक यांचे सामाजिक कार्य मोठे असून कुंभार समाजाला त्यांचे नेहमीच सहकार्य लाभले आहे, असा त्यांच्या कार्याचा गौरव करुन नवी मुंबई कुंभार समाजाने देखील लोकनेते नाईक यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मंडळाचे अध्यक्ष मोहन कुंभार आणि कार्यकारिणीने पाठिंब्याचे पत्र प्रसिध्द केले आहे.
महाराष्ट्र रिक्षा चालक सेना
महाराष्ट्र श्रमिक सेना संलग्न महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्यावतीने लोकनेते नाईक यांना पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिक महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी परिश्रम घेणार असून लोकनेते नाईक यांना मोठया मताधिक्क्यांनी जिंकून आणण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केल्याचे संघटनेचे नवी मुंबई अध्यक्ष व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे यांनी सांगितले आहे.
बुलढाणा जिल्हा उत्कर्ष मंडळ
बुलढाणा जिल्हयातील मूळ रहिवासी मोठया संख्येने नवी मुंबईत राहतात. या समाज बांधवांच्या कल्याणाचे विविध उपक्रम बुलढाणा जिल्हा मराठा उत्कर्ष मंडळाच्यावतीने राबविण्यात येतात. लोकनेते नाईक यांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्य मोलाचे असून मंडळाच्यावतीने शिवाजी शिंदे, मदन शिंदे, बळीराम मिसाळ आदी पदाधिकार्यांनी लोकनेते नाईक यांच्या प्रचारासाठी सक्रीय सहभाग घेणार असल्याचे म्हटले आहे.
मुस्लीम समाजाचा पाठिंबा
लोकनेते नाईक यांनी नवी मुंबईत सर्वधर्म समभावाचे वातावरण कायम राहिल, याची सदैव काळजी घेतली. कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला या शहरात निर्भयतेने जगता येते. डॉ. आसिफ शेख, मौलाना मुफती अबुबकर, मोहंमद आरिफ अली, हाफिज शेख, माजिद भाई आदी मुस्लीम समाजातील मान्यवरांनी लोकनेते नाईक यांना त्यांच्या या नेतृत्वशैलीमुळे पाठिंबा जाहीर केला आहे.
अपक्ष उमेदवार ऍड. बापू पोळ यांचा पाठिंबा
ऐरोली विधानसभा मतदार संघाच्या आणि एकूणच नवी मुंबईच्या गतिमान विकासासाठी लोकनेते नाईक विधानसभेत निवडून जाणे गरजेचे असून या भावनेतून अपक्ष उमेदवार ऍड. बापू पोळ यांनी आपली उमेदवारी मागे घेत लोकनेते नाईक यांना आपला पाठिंबा दिला आहे.
कोकण दर्पण .





