उरण , कोकण दर्पण वृत्तसेवा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खारघरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते , मात्र महायुतीच्या उरण विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवाराला जाणीवपूर्वक बोलविले नसल्याचा सणसणीत आरोप शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज केला आहे. भाजपने शिवसेने सोबत केलेला हा दगाफटका असल्याची टीका देखील बारणे यांनी केली आहे.
पनवेलचे विधानसभेचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, डोंबिवलीचे उमेदवार पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पेणचे उमेदवार रवीशेठ पाटील, ऐरोलीचे उमेदवार गणेश नाईक, बेलापूरच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज खारघर मध्ये आले होते. मात्र , उरण मधील शिवसेनेचे उमेदवार आमदार मनोहर भोईर यांना टाळण्यात आले, भोईर यांना देखील बोलवायला हवे होते असे मनुंद करीत पेण येथील उमेदवारांची सभा इथे होऊ शकते मात्र पनवेल नजीकच्या उरण मधील उमेदवाराची सभा का होऊ शकत नाही असा प्रश्न बारणे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान , उरण मध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप त्यांना आतून रसद पुरवीत त्यांचा प्रचार भाजपचे काहीजण करीत असल्याचा आरोप देखील बारणे यांनी केला आहे. याबाबत शिवसेना वरिष्ठाकडे तक्रार केल्याचे बारणे यांनी सांगितले.
कोकण दर्पण .





