नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा :
ऐरोली विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना-आरपीआय-रासप-रयतक्रांती-शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांचा निवडणूक प्रचाराचा झंझावात बुधवारपासून सुरु झाला. कोपरखैरणे भागात सकाळी निघालेल्या प्रचार रॅलीमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून लोकनेते नाईक यांना प्रचंड मताधिक्क्याने जिंकून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
माजी खासदार डॉ. संजीव गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, ज्येष्ठ समाजसेवक ज्ञानेश्वर नाईक, दशरथ भगत, शिवसेनेचे नगरसेवक रामदास पवळे, युवानेते वैभव नाईक, नगरसेवक लिलाधर नाईक, नगरसेवक मुनावर पटेल, नगरसेविका वैशालीताई नाईक, ज्येष्ठ समाजसेवक वसंत म्हात्रे, मंडळ अध्यक्ष वैभव पाटील, शिवसेना विभागप्रमुख वासुदेव पाटील, ज्येष्ठ नगरसेवक रविंद्र इथापे, ज्येष्ठ नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक सुरज पाटील यांच्यासह भाजपा-शिवसेना महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.
प्रचार रॅलीदरम्यान लोकनेते नाईक यांचे सर्वच ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. लोकनेेते नाईक यांनी जनतेला अभिवादन करुन त्यांचे आशिर्वाद घेतले. या भागांतील सर्व स्तरातील आणि विविध समाजाचे नागरिक त्यांच्या प्रेमापोटी मोठया संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. नागरिकांनी गरजेपोटी बांधलेली बांधकामे कायदेशीररित्या नियमित करणे, जादा एफएसआयच्या माध्यमातून सिडकोच्या धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी करणे आणि या इमारतींमधून राहणार्या रहिवाशांना चांगली दर्जेदार घरे उपलब्ध करुन देणे तसेच एस.आर.ए.च्या माध्यमातून झोपडपटटयांमधील रहिवाशांना हक्काची घरे उपलब्ध करुन देवून त्यांचे राहणीमान उंचावणे या कामांना जिंकून आल्यावर प्राधान्य राहिल, अशी प्रतिक्रिया लोकनेते नाईक यांनी या रॅलीप्रसंगी दिली. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना उत्तम प्रकारे मुलभूत आणि इतर आधुनिक सुविधा पुरविल्या जात आहेत. या सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण वाढ करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. ऐरोली मतदार संघाचे दोन वेळा प्रतिनिधीत्व केलेले संदीप नाईक यांच्या आग्रहाखातर एका वेगळया परिस्थितीत ही निवडणूक आपण लढवत असून या पुढील पंचवार्षिकमध्ये तेच या मतदार संघाचे आमदार असतील, असे लोकनेते नाईक यांनी विशेषत्वाने नमूद केले.
कोपरखैरणे विभागात बोनकोडे येथून रॅलीस प्रारंभ झाला. रामनगर, खैरणे गाव, सेक्टर १२, कलश उद्यान, फाम सोसायटी, बालाजी गार्डन, सेक्टर १० इत्यादी भागांत फिरल्यानंतर सेक्टर ९ येथे या रॅलीची सांगता झाली.
अपक्ष उमेदवार आणि सोलापूर जिल्हा बहुजन एकता रहिवासी संघाचा पाठिबा..
सोलापूर जिल्हा बहुजन एकता रहिवासी संघाच्या माध्यमातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले दत्तात्रय सावळे यांनी बुधवारी आपली उमेदवारी पाठीमागे घेवून लोकनेते गणेश नाईक यांना पाठिबा जाहीर केला. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ आणि ऍड. यशपाल ओहोळ यांनी आवाहन केल्यानुसार माजी आमदार संदीप नाईक यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनुसार सावळे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. सावळे यांच्यासह संघाचे कार्याध्यक्ष रामजी गायकवाड, महासचिव दिलीप गायकवाड, संघटक संजय माने यांनी संघाच्या माध्यमातून सोलापूर रहिवाशांची ताकद लोकनेते नाईक यांच्यासाठी उभी करण्याचा निर्धार केला आहे.
कोकण दर्पण




