नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : बेलापूर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस -आरपीआय आघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे निरीक्षक प्रशांत पाटील , प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी उपस्थित होते.
नेरुळ येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयातून कार व मोटरसायकलवर भव्य रॅली काढून अशोक गावडे यांच्या कार्यकर्त्यांचा ताफा सेक्टर १५ सीबीडी बेलापूरला पोहचला. तिथून पदयात्रेद्वारे अशोक गावडे कोकण भवन कार्यालयात पोहचले आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
बेलापूर विधानसभा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे , आणि तो राष्ट्रवादीकडे कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता आज पेटून उठला आहे. आज ज्या स्वार्थी राजकारणाचे पेव फुटले आहे , ते आपली जागरूक जनता पहात आहे. जनतेवर , लोकशाहीवर माझा विश्वास आहे , त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे , असा विश्वास अशोक गावडे यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईतल्या बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदार संघात राष्ट्रवादी आपले अस्तित्व कायम असल्याचे दाखवून देईल, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली .
कोकण दर्पण.





