Press "Enter" to skip to content

दापोली – खेड – मंडणगड विधानसभा : जनतेला हवाय पर्यटन विकास आणि बंदरांचा विकास साधणारा आमदार !

दापोली , कोकण दर्पण वृत्तसेवा : कोकणाला आता पर्यंत आश्वासनांपलीकडे काहीही मिळाले नाही. पुढार्यांनी फक्त कोकणात राजकारण केले , राजकारणाच्या या शापामुळेच कोकणाचा विकास रखडला असा आरोप तिन्ही तालुक्यातील जनतेने केला आहे. दापोली- खेड – मंडणगड विधानसभा मतदार संघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे आम्हाला दापोली- खेड – मंडणगड मध्ये विकासाचे नवे मॉडेल देणारा आमदार हवाय, अशी प्रतिक्रिया येथील जनतेने कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली आहे. विकासाच्या नावावर आमची फक्त फसवणूक झाल्याची खंत दापोली , खेड , मंडणगड तालुक्यातील जनतेने व्यक्त केली आहे.

दापोली- खेड – मंडणगड तालुक्यात रोजगार निर्मिती करण्यात शासन आणि प्रशासनातील सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. विरोधकांनी देखील या मुद्यांकडे गांभीर्याने पाहिले नाही किव्हा मुद्दा उचलला नाही. कोकणाला पर्यटनाचे अमूल्य वरदान लाभले आहे. मात्र , पर्यटनाचा हवा तसा विकास झाला नाही .दापोली , मंडणगड , खेड तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची नेहमीच निराशा होते. पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा नसल्याने पर्यटनाला चालना मिळत नाही. दापोली , मंडणगड तालुक्यातील मुख्य रस्ता वर्षानुवर्षे उखडलेला असतो. निवडणुकीच्या काळात थातुरमुतुर केले जाते. मात्र , हा विकास म्हणावा का ? गावागावातील रस्ते राजकारणात आडखले आहेत. येथील दाभोळ बुरोंडी हर्णे हि महत्वाची बंदरे आहेत. हर्णे हे रत्नागिरी जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमणकाचे बंदर आहे. मात्र , या बंदरांचा विकास झालेला नाही. त्यामुळे भविष्यात मच्छिमार व्यवसायाला गंडांतर येण्याचा धोका वर्तविला जात आहे.

कोकणात नेहमीच मुसळधार पाऊस कोसळतो. येथील शेतीचे पावसात नुकसान होते. मात्र येथील शेतकऱ्यांना न्याय देताना आता पर्यंत झालेले आमदार पुढे दिसले नाहीत.अशा अनेकविध प्रश्नांनी दापोली खेड मंडणगड मतदार संघ वेढलेला आहे. या प्रश्नातून मार्ग काढणारा , विकासात राजकारण न करता विकासाला गती देणारा आमदार येथील जनतेला हवा आहे.

कोकण दर्पण.