कल्याण, कोकण दर्पण वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीत कौल कोणाला द्यावा ? कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राचा विकास खऱ्या अर्थाने कोण करणार ? अशा वैचारिक संभ्रमात कल्याण पूर्वेकडील जनता सध्या असल्याचे दिसत आहे. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकासाला गती कोण देईल ? कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राचा कायापालट कधी होणार ? असा सवाल कल्याण पूर्वेकडील जनता करत आहे.
ठाणे जिल्ह्यातील आणि कल्याण लोकसभा मतदार संघातील विकासापासून वंचित असलेला कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघ आहे. हे क्षेत्र कल्याण महापालिकेत येत असताना महापालिकेने देखील कल्याण पूर्व विभागाच्या विकासाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.
मुबलक पाणी आणि अत्याधुनिक सोई सुविधा असलेल्या सरकारी रुग्णालयाची येथील जनतेला प्रतीक्षा आहे. कचरा आणि वाहतुकीचे नियोजन नाही. रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे पहायला मिळतात. वाहतुकीची कोंडी हा येथील डोकोदुखीचा प्रश्न आहे.
त्यामुळे झालेल्या अपघाताने अनेकांचे बळी घेतले आहेत.
येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न प्रलंबित आहे. मागील ३० वर्षांहून अधिक काळ चाळीमध्ये राहणारे रहिवाशी त्रस्त आहेत. इथल्या चाळींच्या पुनर्वसनाचा प्रश्न गुंतागुंतीचा बनला आहे. अनेक ठिकाणी सोसायट्यांच्या कनव्हीन्स डीड न झाल्याने चाळींच्या जमिनी सोसायट्यांच्या नावावर नाही.
कल्याण पूर्व भागात लोकसंख्या वाढतेय मात्र विकासाची गती मात्र संथ असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, रखडलेल्या विकासाला गती देणारा हक्काचा आमदार आम्हांला हवाय, अशी प्रतिक्रिया कल्यांणकरांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.
कोकण दर्पण.





