नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे संस्थापक – अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुजारी हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठाणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढले होते.
राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून पुजारी हे मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबईच्या सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत आहेत. नवी मुंबईतील समाजकारण आणि राजकारणात त्यांचे स्थान आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन पुजारी यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुजारी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी नियुक्यी करण्यात आली आहे. नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली विधानसभा क्षेत्रात आणि संपूर्ण नवी मुंबईत राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार , अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जुन पुजारी यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.
कोकण दर्पण.





