Press "Enter" to skip to content

नवी मुंबई राष्ट्रवादीला संजीवनी देण्यासाठी शरद पवार यांचा भव्य कार्यकर्ता मेळावा !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नवसंजीवनी देण्यासाठी एपीएमसी येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित सदर मेळावा होणार असून राष्ट्रवादीचे अन्य नेते देखील मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अशोक गावडे यांनी सानपाडा येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. १५ सप्टेंबर रोजी एपीएमसी कांडा बटाटा मार्केट मध्ये सकाळी ९ वाजता सदर मेळावा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर नवी मुंबई राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले , तदनंतर अशोक गावडे यांच्या खांद्यावर शरद पवार यांनी नवी मुंबईतील राष्ट्रवादीची धुरा सोपवली. या पुढच्या काळात राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान आहे. मात्र ते आव्हान पेलण्यास राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता सक्षम असल्याचा विश्वास अशोक गावडे यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक आमच्या सोबत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. सदर मेळाव्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अशोक गावडे यांनी केले आहे.
बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदार संघात राष्ट्रवादीकडे प्रभावी उमेदवार असून आम्ही आमची ताकत नक्की दाखवू , असा विश्वास प्रशांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »