Press "Enter" to skip to content

शहीद जवान योगेश पाटील यांच्या जीवनावरील “शौर्यश्री“ गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न ! भारतीय सैन्यदलातील माजी अधिकारी, वीर शहीद जवान कुटुंबीयांची प्रमुख उपस्थिती !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा (जान्हवी साल्पेकर ) : सिसा पब्लिकेशन्स द्वारा जेष्ठ पत्रकार तथा कोकण दर्पणचे संपादक संजय महाडिक लिखित “शौर्यश्री“ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन जुईनगर येथे एका विशेष सोहळ्यात रविवारी ( दि.१ सप्टेंबर) करण्यात आले. २६ नोव्हेम्बर २००८ साली मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात देश रक्षणासाठी शहिदत्व पत्करलेल्या वीर शहिद जवान योगेश सुनीता शिवाजी पाटील या योध्याच्या जीवनावर हा ग्रंथ आहे. नवी मुंबईतील मानव सेवा संस्थेच्या वतीने वीर शहिद जवानांच्या कुटुंबीयांचा आणि भारतीय सैन्यदलातील माजी सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी “शौर्यश्री“ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन देखील करण्यात आले.
भारतीय सैन्यदलातील कमांडर बी.बी.मिस्त्री, एम .प्रसाद, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर अशोक गावडे , स्थायी समिती सदस्य रंगनाथ औटी, मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, सिनेकलाकार प्रकाश राणे, नयन पवार, राजे प्रतिष्ठानच्या महिला महाराष्ट्र संघटक स्वाती बागडे, नवी मुंबई अध्यक्ष उर्मिला गव्हाणे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते “शौर्यश्रीचे “ प्रकाशन करण्यात आले. यावेळी मानव सेवा संस्थेचे अध्यक्ष योगेश महाजन, माजी सैनिक सुरेश काकडे, वीरमाता सुनीता पाटील, वीरपिता शिवाजी पाटील, “शौर्यश्री“ या गौरव ग्रंथाचे लेखक संजय महाडिक व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुंबईवरील २६/११ अतिरेकी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली. देशातील १८ जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. शेकडो नागरिकांचे नाहक बळी गेले. ज्या वीर जवानांनी अतिरेक्यांना ढेर केले ,देश रक्षणासाठी शहिदत्व पत्करले त्या वीर जवानांचे शौर्य, बलिदान, त्याग आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा आणि विशेषत्वाने विरपुत्र शहीद योगेश सुनीता शिवाजी पाटील यांच्या धाडसाला सलाम करण्यासाठी शौर्यश्री हा ग्रंथ सिसा पब्लिकेशन द्वारा अर्पित करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यातील जवान योगेश पाटील याने मुंबई पोलीस दलात साडेतीन वर्ष सेवा केली. अगदी वयाच्या २३ व्या वर्षी त्याने देशासाठी शहिदत्व स्वीकारले. शहीद योगेशचे वडील शिवाजीराव पाटील हे देखील रायगड पोलीस दलात अधिकारी म्हणून कार्यरत होते. योगेशचा जीवन संघर्ष अपार आहे. कमी वयात त्याने आयुष्याचे अनेक रंग पाहिले आहेत. तरुण पिढीला शौर्यश्री गंथ देशसेवेसाठी नक्कीच प्रेरणा देईल, नवी ऊर्जा देईल असा विश्वास लेखक संजय महाडिक यांनी यावेळी व्यक्त केला.

शौर्यश्री हा गौरव ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांना तसेच ग्रंथालयांना संग्रहासाठी भेट देणार असल्याचे देखील संजय महाडिक यांनी सांगितले.

 

शौर्यश्री या गौरव ग्रंथाचे मुखपृष्ठ विनोद महाबळ यांनी रेखाटले आहे तर व्ही बी पोखरकर यांनी मुद्रितशोधन केले आहे. अंकाची सजावट अभय गावडे यांनी केली तर अभिनव ग्राफिक्सने मुद्रण कार्य केले.

कोकण दर्पण.