Press "Enter" to skip to content

सामाजिक जाणिवेचा आपला माणूस : सूरदास गोवारी !

अपार मेहनत , जिद्द , प्रामाणिकपणा , माणुसकी आणि आपलेपणा , ध्येय गाठण्याची धडपड आणि सतत प्रयत्न करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे कामोठे नगराचे सुपुत्र सूरदास दामाजी गोवारी होय. समाजाच्या विकासाठी सार्वजनिक जीवनात समरस होऊन जगणारी माणसं फारच कमी असतात. आपल्या कुटुंबापेक्षा समाज हेच त्यांचे कुटुंब असते. आपण समाजाचे देणेकरी या जाणिवेने त्यांची जगण्याची भूमिका असते. असेच भारदस्त व्यक्तिमत्व सूरदास दामाजी गोवारी यांचे आहे.

रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक पार्शवभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची हि क्रांतिभूमी आहे. याच क्रांती भूमीत पनवेल तालुक्यातील कामोठे नगरात ५ ऑगस्ट १९६८ साली सूरदास गोवारी यांचा जन्म झाला. एका शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने सामाजिक परिस्थीची जाण आणि भान त्यांना होती. १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आज एक यशस्वी उद्योजक , एक यशस्वी समाजकारणी , एक यशस्वी राजकारणी म्हणून सूरदास गोवारी यांनी आपली प्रतिमा समाजात निर्माण केली आहे, मात्र या यशामागे फार मोठा संघर्ष आहे. अपार कष्ट आणि संघर्षाचे ते फलित आहे. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सूरदास गोवारी यांनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांदयावर घेण्याचा निर्णय घेतला, तयासाठी अपार कष्ट करावे लागतील, हि जाणीव त्यांना होती. त्यांनी रिक्षा चालविण्याचा व्यवसाय सुरु केला.पुढे टुरिष्ट व्यवसाय सुरु केला. काम करता करता बारावी पर्यतचे शिक्षण पूर्ण केले. आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची जिद्द सूरदास गोवारी यांच्यामध्ये कायम होती . म्हणूनच त्यांनी कामोठे नगरात शिक्षणाचे नवे केन्द्र सुरु केले.शिक्षण क्षेत्रात एक भरीव योगदान सूरदास गोवारी यांचे आहे.

देशाच्या अभूतपूर्व इतिहासात रायगड जिल्ह्याचे नाव सोनेरी अक्षरांनी कोरलेले आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगर एक शैक्षणिक हब म्हणून नावलौकिकास आले आहे. याच पनवेल महानगरात गणपत राघो गोवारी शैक्षणिक व सामाजिक संस्थेने कामोठे येथे शिक्षणाचे केंद्र सुरु केले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाबरोबर उच्च शिक्षणाचे दालन देखील संस्थेने खुले केले आहे. दामाजी गणपत गोवारी विद्यालय आणि डी.जी. गोवारी ज्युनिअर कॉलेज या शैक्षणिक उपक्रमांची यशस्वी वाटचाल कामोठे येथे सुरु आहे. संस्थेने रोवलेला शिक्षणाचा पाया आणखी मजबूत करू , त्याला गुणवत्तेची जोड देऊ , असा विश्वास सूरदास गोवारी यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केला.
नवी मुंबई पाठोपाठ पनवेल महानगरात शिक्षणाची अनेक दारे खुली झाली. मात्र, शिक्षणातील व्यापार आणि महागडे शिक्षण हे सर्वसामान्य विध्यार्थ्याला परवडणारे नाही. हि खंत कामोठे येथील सामाजिक कार्यकर्ते दामाजी गणपत गोवारी यांना होती. फुले, शाहू , आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जोपासणारे दामाजी गोवारी हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षणाची महती जाणून होते. सामान्य कुटुंबातील विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे , हि भावना राखून दामाजी गोवारी यांनी कामोठे येथे २००९ साली शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली .शिक्षणाचे एक छोटेसे रोपटे लावले.आज ते रोपटे वटवृक्ष होत आहे. दामाजी गणपत गोवारी यांचे चिरंजीव आणि सामाजिक कार्यकर्ते सूरदास गोवारी यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची वाटचाल यशस्वीपणे सुरु आहे. संस्थेचे चेअरमन सूरदास गोवारी यांनी सामाजिक जाणीव सदॆवपणे जपली आहे. पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक वाटचालीत कामोठे येथील दामाजी गणपत गोवारी विद्यालय आणि डी.जी. गोवारी ज्युनिअर कॉलेजचा महत्वपूर्ण वाटा आहे. कामोठे सेक्टर ३६ येथे संस्थेच्या वतीने भव्य शिक्षण संकुल उभे करण्याचा आरंभ झाला आहे. मराठी व इंग्रजी माध्यमातील शिक्षणाबरोबर कला , वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून महाविद्यालयीन शिक्षणाची संधी येथे खुली आहे. दहावीचा १०० टक्के निकाल हे विद्यालयाचे खास वैशिष्ट्ये आहे.

सूरदास गोवारी हे विविध सामाजिक संस्थांवर कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते पदाधिकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य आणि पनवेल तालुक्याचे ते खजिनदार आहेत. मागील अनेक वर्षांपासून सूरदास गोवारी यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जातात. सार्वजनिक उत्सव , राष्ट्रीय उत्सव , आरोग्य शिबीर , महिला, विध्यार्थी, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात.

सूरदास गोवारी यांचे सामाजिक योगदान असेच समाजासाठी कायम उपयुक्त रहावे, हीच त्यांना वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्या !

संजय महाडिक

कोकण दर्पण.

 

 

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »