Press "Enter" to skip to content

खारघर- कोपरा पुलावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे बेहाल ! सिडको, महापालिका, सत्ताधारी कोपरा पुलाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देतील का ?

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर- कोपरा पुलावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसागणिक अत्यंत गंभीर बनत चालला आहे. प्रशासन मात्र तात्पुरता पर्याय करून मुख्य प्रश्नाला बगल देण्याचे काम इतकी वर्ष करत आहे. त्यामुळे वाहतूकदार आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान , सिडको प्रशासन ,पनवेल महापालिका प्रशासन, वाहतूक पोलीस आणि सत्ताधारी कोपरा पुलाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देतील का ? असा सवाल खारघरवासियांनी केला आहे.

कोपरा पुलावरील वाहतूक कोंडी, वाहनचालकांची एकमेकांवर अरेरावी, एकमेकांना दमदाटी असे चित्र खारघर -कोपरा पुलावर नेहमीच पाहायला मिळत आहे. नेहमीच्या या परिस्थितितून एखादा भयानक प्रकार घडण्याच्या शक्यतेकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. खारघर सेक्टर १५ कडून सायन -पनवेल महामार्गाला जोडणारा हा कोपरा पूल आहे.खरतर कोपरा पूल हा वाहतुकीचा पूल नाही. खारघर ग्रामपंचायतीच्या काळापासून हा पादचारी पूल आहे. खारघर सेक्टर १४,१५, १६, १८ हा परिसर मोठ्या झपाट्याने वाढत आहे. लोवस्तीबरोबर वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पनवेलकडे जाण्यासाठी महामार्गाला जोडणारा रस्ता पूर्णावस्थेत नसल्याने कोपरा पादचारी पुलावरूनच गाड्यांची वाहतूक सुरु झाली. पादचारी पुलावरून होणाऱ्या वाहतुकीला वाहतूक पोलिसांनी सुरुवातीलाच अटकाव न घातल्याने हळूहळू येथील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला. एकाच पुलावरून ये-जा करण्याचा वापर होत असल्याने वाहतुकीची मोठी तेव्हा देखील कोंडी होत होती. वाहतुकीची वाढती समस्या पाहून सिडकोने दोन वर्षांपूर्वी कोपरा पुलाजवळ आणखी एक लहान पूल बांधला. जुना पादचारी पूल वाहने खारघर बाहेर जाण्यासाठी आणि नवा पूल महामार्गावरून वाहने खारघर मध्ये येण्यासाठी सुरु केला. मात्र, मागील अनेक महिन्यापासून पूर्वीचा पादचारी पूल नादुरुस्त झाल्याने पुन्हा जैसे-थे परिस्थिती निर्माण झाली आहे. एकाच पुलावरून वाहतुकीची ये-जा सुरु असल्याने वाहनांची दोन्ही बाजूला मोठं मोठ्या रांगा लागून राहतात. अनेकदा वाहनांच्या रांगेमुळे कोपरा महामार्ग देखील जाम होऊन जातो. वाहतूक पोलिसांनी एनेकवेळा येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र , पुलाची समस्या सुटल्याशिवाय येथील वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही.

कोपरा येथील जुना पादचारी पूल नादुरुस्त झाल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सायन – पनवेलला जोडणारा मार्ग बंद असल्याने महार्गाकडे जाणारा मार्ग बंद असल्याचा नो इंट्री बोर्ड सिडकोने लावून तूर्त जबाबदारी झटकली आहे. सध्या कोपरा येथे वन वे मार्ग सुरु आहे. येथून महामार्गाकडे जाणारा प्रवास निषिद्ध केला आहे . मात्र , तिथे वाहतूक पोलीस तैनात नसल्याने वाहनचालकांनी देखील वन वे मार्ग प्रवासाचा नियम धाब्यावर बसविला आहे. त्यामुळे कोपरा पुलावरील वाहतुकीची समस्या क्लिष्ट आणि गंभीर बनली आहे. खारघर मधील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रस्नाचा पाठपुरावा केला , मात्र प्रशासन गांभीर्याने का घेत नाही ? कोपरा पुलाच्या प्रश्नाचे मूळ का सापडत नाही ? हा मूळ मुद्दा आहे.

चौकट
खारघर – कोपरा पुलावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न तात्काळ सोडवा – बळीराम नेटके

खारघर -कोपरा पुलाचा प्रश्न म्हणजे सध्याची खारघरची मोठी समस्या होऊन बसली आहे. सिडको, महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष न देणे हि मोठी दुर्दैवाची बाब आहे. मात्र , मागील अनेक वर्षांपासून कोपरा पुलाच्या प्रश्नाचे भिजत घोंगड पडलं आहे. खारघरची वस्ती मोठ्या झपाट्याने वाढत आहे, खारघर सेक्टर १४, १५, १६, १८ परिसरात लाखो लोक वास्तव्य करतात. त्यामुळे सायन – पनवेल महामार्गाला जोडणारा वाहतुकीचा मोठा मार्ग सिडको अथवा पनवेल महापालिका प्रशासनाने निर्माण करून दिला पाहिजे. कोपरा येथील पादचारी पुलावर अवलंबून न राहता स्वतंत्र असा वाहतुकीचा पूल बांधला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके यांनी केली आहे. सिडको आणि महापालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि कोपरा पुलाचा प्रश्न सोडवावा , अन्यथा जनआंदोलन करू, असा इशारा देखील बळीराम नेटके यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिला.

 

खारघर -कोपरा येथील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी कोस्टल ब्रिज बांधणार – सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर !

खारघर -कोपरा येथील वाहतुकीचा प्रश्न दिवसागणिक वाढत आहे. सदर प्रश्नांची सिडको प्रशासनाने गंभीरपणे दाखल घेतली असून लवकरच येथील वाहतुकीच्या समस्येतून सुटका होणार आहे. सायन- पनवेल महामार्गाला जोडणारा कोस्टल ब्रिज बांधणार असल्याची माहिती सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिली.