Press "Enter" to skip to content

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा स्व. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने सन्मान !

पुणे, कोकण दर्पण वृत्तसेवा : समाजसेवेचा आत्मा असलेले आणि समाजहिताला केंद्रबिंदू माणून काम करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी पुणे या संस्थेच्या वतीने स्व. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (शुक्रवार, दि. २५ जानेवारी) पुणे येथे समारंभपूर्वक सन्मान करण्यात आला.
स्व.रावसाहेब शिंदे यांच्या तिसर्‍या स्मृतिदिनी निवारा सभागृहात झालेल्या सोहळ्यात माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन स्व. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, स्व. रावसाहेब शिंदे यांच्या पत्नी शशिकला शिंदे, भगीरथ शिंदे, डॉ. राजीव शिंदे, दगडू लोमटे, सुभाषराव चव्हाण, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासमवेत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचा साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रासाठी, विनायकदादा पाटील यांचा सामाजिक, कृषी, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यासाठी स्व. ऍड. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या नावाने कार्यरत असलेली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हितसंबंध आणि मूल्य, व्यावसायिकता, सामाजिक संवेदनशीलता आणि गतिशील उद्योजकता यांना प्रोत्साहन देऊन जागतिक विचारांना प्रोत्साहन देणारी संस्था एक शैक्षणिक पाया म्हणून विकसित झाली आहे.दर्जेदार शिक्षण आणि अत्याधुनिक सुविधा आणि पायाभूत सुविधांसह कार्यरत असलेल्या या संस्थेने 25 वर्षाच्या कालावधीत शिक्षणासह विविध क्षेत्रात गौरवशाली गरुडझेप घेतली आहे. स्वतःची शिक्षण संस्था असतानाही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेवर मनापासून आणि निस्वार्थीपणे प्रेम केले. रयतेला भरभरून दिले. त्यांचे कर्तृत्व आणि दातृत्व समाजाला दिशा देण्याचे काम करीत आहे, त्यामुळे देश- विदेशातील विविध संस्थांच्या वतीने त्यांचा मानाच्या पुरस्काराने गौरव झाला असून रयत शिक्षण संस्थेचा रयत माऊली, ‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव’ या बहुमानाच्या पुरस्काराने यापूर्वीच सन्मान झाला आहे, आज थोर विचारवंत स्वातंत्र्यसेनानी स्व. रावसाहेब शिंदे यांच्या नावाने स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी दानशूर रामशेठ ठाकूर असा गाजर होताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
कतॄत्वाच्या जोरावर जिद्दीने आणि परिस्थितीचे अडचणीचे डोंगर पार करून लोकनेते रामशेठ ठाकूर यशाच्या उच्च शिखरावर पोहोचले. समाजसेवेचे व्रत त्यांनी अंगी जोपासल्यामुळे ते सर्व समाजाच्या विकासासाठी सातत्याने झटत त्यामध्ये आपले योगदानही सातत्याने देत आहेत, त्यामुळे त्यांना ‘लोकनेते’ ही उपाधी खऱ्या अर्थाने समाजाने दिली. या जगात अनेक श्रीमंत आहेत अनेकांकडे पैसा आहे मात्र ती इतरांना देण्याची दानत मात्र थोडयाच लोकांकडे आहे, कारण सत्कार्य करण्याचे भाग्य ठराविक लोकांनाच मिळते आणि ते भाग्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांना लाभले असून आपण समाजाचे देणेदार लागतो अशी भावना ठेउन केलेले कार्य नेहमी सत्कारी लागते आणि आपण आर्थिकरित्या मोठे होत असताना समाजाला मदत करणे हे आपले परम कर्तव्य आहे हा अत्यंत मोलाचा विचार त्यांनी यांनी अंगिकारल्यामुळे हजारो जणांना आपल्या पायावर सक्षम उभे करण्याचे काम त्यांनी केले. गरजूंना मदत करणे हा जणू त्यांचा धर्मच असल्यामुळे ते माणसाशी माणसासारखे वागत असून त्यांची या मातीशी आणि येथील गोरगरिब जनतेशी नाळ जोडलेली सर्व महाराष्ट्राला पहायला मिळाली असून त्यांनी सामाजिक सेवेची प्रथा समाजामध्ये निर्माण केली आहे, रंजल्या गांजल्यांसाठी नेहमीच आशेचा किरण ठरलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आज पुण्यात झालेला गौरव हा सामाजिक बांधिलकी, सकारात्मक विचारसरणी, कठोर परिश्रमाचा आणि समाजदूताचा सन्मान झाल्याची भावना यावेळी या सोहळ्यात पहायला मिळाली.

चौकट- माणूस जन्माला येतो ते आपल्या पूर्व जन्माचे संचित घेऊन असं अध्यात्म सांगतं. पूर्व जन्मात आपण कोण असतो हे कुणालाच महीत नसते. हा जन्म आपण याची देही याची डोळा पाहातो-अनुभवतो. पुढील जन्माचे संचिताचे कर्म हीच याच जन्माची फलश्रॄती असते. जगात कित्येक माणसं रोज जन्माला येतात आणि कित्येक जगाचा निरोप घेतात. पण आपल्या लक्षात किती राहतात , जे लक्षात राहतात ते कर्माने मोठे असतात, ज्यांना धर्म कळला त्यांना कर्म कळलेले असते ज्यांना कर्म कळले त्यांना जगण्यातले मर्म कळलेले असते, ती माणसं जगताना समाजाला सोबत घेऊन पुढे जात असतात म्हणूनच ते समाजात आदर्श ठरतात, त्याचप्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्य कायम समाजाला प्रेरणा आणि शक्ती देणारे आहे.

कोट- थोर विचारवंत स्व. रावसाहेब शिंदे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचे कायम कौतुक केले. माणूस आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व असा जाहीर उल्लेख त्यांनी करतानाच त्यांच्या दातृत्वाचा आणि कर्तृत्वाचा नेहमीच गौरव केला आहे. स्व. रावसाहेब शिंदे आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाते बंधुत्वाचे होते. त्यामुळे या पुरस्काराचे महत्व त्यांच्यासाठी अनन्य साधारण आहे.

कोकण दर्पण