Press "Enter" to skip to content

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत कामगारनेते महेंद्र घरत भाजपावर कडाडले !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेलमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त आयोजित सभेत मान्यवरांच्या मुलुख मैदानी भाषणानंतर इंटक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी भाजपावर हल्लाबोल केला. काँग्रेसमधून गेलेल्यांची आता पुव्ह परत येण्याची वेळ असल्याचे बोलून जनतेला सत्तापरिवर्तन करायचे असल्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यांची रीघ वाढत चालली आहे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी महेंद्र घरत यांनी पुढे बोलताना सांगितले की, पक्षाचे धोरण राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार चालत आहे. मोदी सरकारची २०१४ मध्ये आलेली लाट आता ओसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येणारी लाट ही मोठी लाट असणार असल्यामुळे केंद्रात तसेच राज्यात सत्तापरिवर्तन होणारच असल्याचे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांवरून समोर आले आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, २०१४ साली आ.प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांच्या मागे अर्ध्याहून अधिक कार्यकर्त्यांची फळी निघून गेल्यामुळे काँग्रेस पक्षाची पडझड झाली होती. मात्र आता साडेचार वर्षात आम्हाला पक्ष उभा करण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागलेत. भाजपच्या गाजरांना भुलणारे कार्यकर्ते आता पुन्हा आपल्या घरी परतत आहेतच तर त्याहीपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना ते सोबत घेऊन येत असल्यामुळे पानवेलसह रायगडमध्ये आता काँग्रेस पक्ष ताकतीने उभा राहण्यास सक्षम आहे. यावेळी त्यांनी खा.अशोक चव्हाणांना सूचनात्मक विचार मांडताना सांगितले की, आज पक्षामध्ये जी ताकद आहे त्याचा विचार करूनच आघाडीचा विचार करावा. काँग्रेस पक्षाचा मान सन्मान होणार असेल तरच एकत्र या नाहीतर आपण स्वबळावर लढण्यासाठी आपली ताकद तयार केली आहे. आज रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेस जिवंत आहे, ताठ आहे एवढेच नाही तर रायगडमधील इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेस स्ट्रॉंग असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. आजच्या सभेला आम्ही शाश्वत नव्हतो की इतक्या मोठ्या प्रमाणावर जनता उपस्थित राहील, मात्र मंडप भरून मंडपाच्या बाहेर जनता उभी राहून नेतेमंडळींचे भाषण ऐकत होते, त्यामुळे त्याठिकाणची काँग्रेसची ताकद काय आहे हे वेगळे दाखविण्याची गरज उरलेली नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोकण दर्पण.