भारताचा इतिहास :
भारत हा देश मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. येथील लिखित इतिहास २,५०० वर्षांपूर्वीचा असून इतर पुराव्यांनुसार भारतात ७०,००० वर्षांपूर्वीपासून मानवी अस्तित्त्व आणि इतिहास आहे.
मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे हे मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुने पुरावे आहेत. पुराणतज्ञांनुसार आदिमानवाने भारतात सत्तर हजार वर्षांपूर्वी प्रवेश केला. साधारणपणे ९,००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व त्याचेच हळूहळू सिंधू संस्कृतीत रुपांतर झाले.[१]. इसवीसनपूर्व ३५००चा सुमार सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली. मोहेंजोदडो व हडप्पा ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. ह्या शहरांचा शोध दयारामजी सहानी यांनी लावला. यानंतरचा काळ (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व ५००) वैदिक काळ समजला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा समज होता की युरोप व मध्य आशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व त्यानंतर वैदिक काळ सूरू झाला[२]. परंतु नव्या संशोधकांचे असे मत आहे असे आक्रमण झालेच नाही. तसेच वैदिक काळ हा पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन असून वैदिक संस्कृती व हडप्पा व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. हा वादाचा मुद्दा असला तरी सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्या काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील सरस्वती नदी ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब, राजस्थान व कच्छ गुजरात मधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली.[३]
इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांडर च्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थित्यंतरे झाली. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते. चंद्रगुप्त मौर्याने मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली ज्याचा सम्राट अशोकाने कळस गाठला. कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला.[४] भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले. हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच दीर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरुपात पुनर्बांधणी झाली. साहित्य, गणित, शास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली.”[५][६] भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतील चोल साम्राज्य, विजयनगरचे साम्राज्य. महाराष्ट्रातील सातवाहन, या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खूणावते. अजिंठा, वेरुळ, हंपीचे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदीरे ही याच काळात बांधली गेली चोल साम्राज्याचा विस्तार आग्नेय अशियातील इंडोनेशिया पर्यंत पोहोचला होता.
११ व्या शतकात इराणमधील मोहम्मद बिन कासीमने सिंध प्रांतात आक्रमण केले व काबीज केले. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारतातील मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली. भारतातील अनेक राज्ये आर्थिक दृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणात सत्ता काबीज करणे तसेच लुट करणे हे मुख्य उद्देश्य असत. गझनी येथील एका राज्यकर्त्याने भारतात लूटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. तैमूरलंगने केलेले दिल्लीतील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे इतिहासकार नमूद करतात.१३व्या शतकात अलाउद्दीन खिलजी नामक शासक आला त्याचे अफगाण ते बंगाल पर्यंत शासन केले .यात राजा रतनसिंघ व राणी पद्मावती चा इतिहास न विसरण्या सारखा आहे. दिल्ली सलतनत ते मोघलांपर्यंत अनेक इस्लामी राज्ये उदयास आली. यातील मुघलांचे राज्य सर्वाधिक विस्ताराचे होते. मुघल राजवटीत शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली,ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुनप्रस्थापन करणे हा होता. मराठा साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच मुघल साम्राज्य क्षीण होत गेले.मराठे शाही नंतर पेशवे आले त्यांनी आपली मुख्य राजधानी पुण्यात वसवली. पहिला बाजीराव पेशवा एक कर्तबगार राजकारणी होता. त्यांचे स्वप्न हिमालयापर्यंत राज्य करण्याचे होते परंतू मस्तानीच्या प्रेमापोटी स्वप्न भंग झाले.पेशवे शाहीचा गौरवशाली इतिहास संपुष्टात आला.पानीपतच्या युद्धात दारुण पराभवानंतर पेशव्यांचें पतन सुरू झाले ज्याचा सर्वाधिक फायदा युरोपीयन साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून वसाहती स्थापल्या होत्या व ते आपले साम्राज्यवादी धोरण पुढे रेटत होते. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सदेगीरी, फुटीचे राजकारण करून हळूहळू भारतातील सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. बंगालपासून् सुरुवात करत, म्हैसूरचा टिपू, १८१८ मध्ये मराठा साम्राज्य, १८५० च्या सुमारास पंजाबमधील शिख व जाट असे एक एक हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी इस्ट इंडीया कंपनीच्या कारभाराखाली गुलाम बनवले.[७]. १८५७ मध्ये ब्रिटीश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पाहता पाहता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटीशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र मिळवण्याची ऊर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर इस्ट इंडिया कंपनी कडून कारभार ब्रिटीश सरकार कडे गेला.
इ.स. १९३७ साली महात्मा गांधी सोबत पंडित जवाहरलाल नेहरू
लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. १९२० मध्ये टिळकांच्या मृत्युनंतर गांधींनी चळवळीची सुत्रे हाती घेत अंहिसेच्या व असहकाराच्या मार्गाने अनेक चळवळी केल्या.[८] सरते शेवटी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लीम असलेला भाग आजचा पाकिस्तान व बांगलादेश हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे.[९] आधुनिक भारताचे निर्माते व अद्वितीय बहुआयामी विद्वान असलेल्या कायदेपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या तब्येतीची तर्वा न करता अत्यंत मेहनतीने ३ वर्षामध्येच जगातील सर्वात महान व मोठे असे भारताचे संविधान लिहिले. घटनाकार बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘भारतीय संविधान’ संविधान समितीला सुपूर्द केले. आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाची अंबलबजावणी सुरू झाली, भारत गणतंत्र राष्ट्र बनले व जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र अशी आज बिरुदावली मिरवत आहे.[१०]
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली. जम्मू आणि काश्मिर व ईशान्येकडील राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरीबीमुळे ग्रामिण भागात सुरू होत असलेला नक्षलवाद यांमुळे भारतातील आतंकवादही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे. १९९० पासुन भारतातील विविध शहरात आतंवादी हल्ले झाले आहेत. भारताचे चीन व पाकिस्तान याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत त्यातून १९४७, १९६५, १९७१ व १९९९ मध्ये युद्धे झाली. भारत अलिप्त राष्ट्रगट चळवळीचा तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचा संस्थापक सदस्य आहे. इ.स.१९७४ आणि १९९८ मध्ये भारताने पोखरण येथे भूमिगत अणुचाचण्या यशस्वीरीत्या पार पाडून स्वत:ला एक आण्विक शक्ती म्हणून सिद्ध केले आहे. १९९१ नंतर भारताने आर्थिक सुधारणांचा अंगीकार केल्यानंतर् झपाट्याने आर्थिक प्रगती केली आहे. खासकरुन सॉफ्टवेर क्षेत्रामध्ये भारताने लक्षणीक कामगीरी केली.[११] गोल गम इस्लामिक आर्किटेक्चर.
प्राचीन सिंधू संस्कृती
सिंधु संस्कृतीतील ब्राह्मण राजा
सिंधु संस्कृती ही भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आहे[१२]. ही संस्कृति प्रामुख्याने सिंधू नदी,सरस्वती नदी व सिंधूच्या उपनद्याकाठी (पंजाबातील ५ मुख्य नद्याच्याकाठी) अस्तित्वात होती. तसेच गंगा यमुना खोरे ते उत्तर अफगणिस्तानपर्यंत ही संस्कृती बहारली.[१३],[१४][१५][१६] सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी इ.स.१९२१ मध्ये प्रकाशात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खनन झाले, त्यात सिंधू संस्कृतीचे ताम्रपाषाणयुगीन स्वरुप स्पष्ट झाले.राखालदास बॅनर्जी यांनी इ.स. १९२२ मध्ये मोहें-जो-दडोचा शोध लावला . यानंतर या दोन्ही स्थळी सर जॉन मार्शल (पुरातत्त्वविभागाचे महासंचालक,इ.स. १९०२ ते १९२८), इ. जे. एच्. मॅके, माधोस्वरुप वत्स, सर मॉर्टिमर व्हीलर इ. संशोधकांनी विस्तृत उत्खनने केली.याशिवाय सर्वेक्षणातील पाहणीत सिंध-पंजाबात (विद्यमान पाकिस्तान) सिंधू संस्कृतीची अनेक प्राचीन स्थळे प्रकाशात आली. सिंधूचे खोरे हेच या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे आगार असल्याने तिला सिंधू संस्कृती अथवा हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले[१७].
सिंधु संस्कृती आधुनिक भारत (पंजाब, हरयाणा, राजस्थान, गुजरात व पाकिस्तानातील पंजाब, सिंध, बलुचिस्तान व वायव्य प्रांत) भूभागावर वसलेली होती. त्यातील बराचसा भाग आधुनिक पाकिस्तानात असला तरी सिंधू संस्कृतीत आजच्या भारतीय संस्कृतीची पाळेमुळे सापडतात व भारताच्या इतिहासाचा अविभाज्य अंग आहे. ही संस्कृती प्राचीन इजिप्त व इराकमधील मेझोपोटेमिया या संस्कृतीं इतकी जुनी आहे. सिंधू संस्कृतीतील रहिवाश्यांनी धातूंचा वापर सूरु केला. मोहंदोजरो, हराप्पा येथे उत्खनात सापडलेल्या शहरांवरुन सिंधू संस्कृतीची ओळख मिळते.
सिंधु संस्कृती व वैदिक संस्कृती हे एकच होती का यावर तज्ञांमध्ये वाद आहेत. नंतर आलेल्या वैदिक आर्यांनी सिंधू संस्कृतीवर आक्रमण केले व कालांतराने नष्ट झाली. असा एक मतप्रवाह आहे जो आजवर ग्राह्य धरण्यात आला होता. तर सिंधू संस्कृती व वैदीि संस्कृती एकच होती व सिंधू संस्कृतीवर कोणत्याही प्रकारची बाह्य आक्रमणे झाली नाहीत परंतु कालांतराने बदलली व जी शहरे नष्ट झाली ती प्रामुख्याने हवामानातील बदल, नद्यांच्या पात्रातील बदल व मोठेमोठे पूर यांनी नष्ट झाली. वैदिक संस्कृती संदर्भात खूप साहित्य आहे परंतु पुरातत्वीय पुरावे नाहीत व सिंधू संस्कृतीबद्द्ल भरपूर पुरातत्वीय पुरावे आहेत परंतु त्या संदर्भात कोणतेही साहित्य नाही.
वैदिक काळ
वेद हे आर्य धर्माच्या मूलस्थानी आहेत.वेद हे अनादी आहेत म्हणजे काय या प्रश्नाची चर्चा आधुनिक कालखंडात सुरु झाली.विशेषत: वेदांच्या अभ्यासाकडे जेंव्हा पाश्चात्य लोकांना आपले लक्ष वळविले तेंव्हा इतर गोष्टींच्या बरोबरच त्यांनी वेदांच्या कालनिर्णयाकडे चर्चा सुरु केली. ख्रिस्ती स्कापूर्वी १००० वर्षाच्या पलीकडच्या काळात वेदरूप काव्य रचली असावीत असे दिसते.
महाजनपदे
गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना उपदेश करताना
सोळा प्रमुख महाजनपदे
नालंदा विद्यापीठ हे जगातील सर्वांत पहिले विद्यापीठ मानले जाते
वैदिक काळाच्या शेवटच्याकाळात प्राचीन भारतातील राज्ये ज्यांचा महाभारतात उल्लेख आहे अशी राज्ये महाजनपदे म्हणून उदयास आली. यांचा प्रामुख्याने वेदांमध्ये, बौद्ध व जैन धर्माच्या साहित्यामध्ये उल्लेख आढळतात. १६ प्रमुख महाजनपदे साधारपणे इसपूर्व १००० ते ५०० च्या आसपास अस्तित्वात होती. मगध,काशी, कोसल, अंग, मल्ल, चेदी, वत्स , कुरु पांचाल, मत्य, शूरसेन, आसक, अवंती, गांधार, कंबोज अशी विविध महाजनपदे अस्तित्वात होती. यांचा विस्तार आधुनिक अफगणिस्तानपासून ते बंगालपर्यंत तर दक्षिणेकडे महाराष्ट्रपर्यंत होता व सर्व प्रमुख महाजनपदे ही गंगा नदीच्या खोऱ्यात होती. सिंधू संस्कृती नंतरचे मोठे नागरी करण या काळात झाले.
या महाजपदांहून वेगळे अशी अनेक लहान सहान राज्ये भारतीय उपखंडात सर्वत्र पसरली होती. बहुतांशी त्यांचे अधिपत्य वांशिक असे तर काही वेळा निवडीप्रमाणे असे. शिकण्याची प्रमुख भाषा संस्कृत होती तर बोलीभाषा अनेक असण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात प्राकृत ही प्रमुख बोली भाषा बोलली जात होती. मराठी व हिंदी भाषांचे मूळ प्राकृत भाषेत असण्याची शक्यता आहे. लहान सहान राज्ये व जनपदे ही चार प्रमुख महाजनपदांच्या अधिपत्याखाली होती. ती म्हणजे कोसल, अवंती,मगध व वत्स.[१८]
वैदिक काळात हिंदू धर्म असा अस्तित्वात नव्हता, वैदिक पूजा- पाठ पद्दतींवर पुजारी वर्गाचे वर्चस्व होते. महाजनपदांच्या काळात भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा हिस्सा असणाऱ्या तत्त्वज्ञानाचा विकास झाला, उपनिषदे व इतर वेदोत्तर साहित्यामधून त्याकाळी आलेले प्रचंड मोठे वैचारिक बदल दर्शावतात. द्वैत अद्वैतवाद्, तसेच नास्तिकवाद, पदार्थवाद, अजिविकवाद इत्यादी मतप्रवाह त्याकाळी अस्तित्वात होते, जैन धर्म व बौद्ध धर्माची तात्विक बांधणी याच सर्व तत्कालिन उहापोहाचा निकाल आहे असे मानतात.[१९]. हे भारताचे वैचारिक सुवर्णयुग होते असे मानतात.
गौतम बुद्धांना इसपूर्व ५३७ मध्ये आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला व ते बुद्ध म्हणून ओळखू लागले. याच सुमारास जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांनाही महानिर्वाण स्थिती प्राप्त झाली. बौद्ध धर्माची व जैन धर्माची सुरुवात झाली.[२०] जैन धर्मियांच्या श्रद्धे प्रमाणे त्यांचीही परंपरा जुनी आहे. वेदांमध्येही काही जैन तीर्थंकरांचा संदर्भ आढळतो[२१]
बुद्ध धर्माची व जैन धर्माची शिकवणीत साध्या व विरक्त राहणीची शिकवण होती जी जनसामान्यांमध्ये लवकर पसरली तसेच त्याचा उलटा प्रभाव वैदिक परंपरांवरही पडला, शाकाहार, अहिंसा हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचा भाग बनले. जैन धर्माचा प्रभाव भारतापुरतेच मर्यादित राहिला तर बौद्ध भिक्कूंनी बौद्ध धर्म भारताबाहेरही पसरवण्यास मदत केली.
उत्तर प्राचीन राज्ये
अलेक्झांडर
मौर्य राज्यातील चांदीची मोहोर
इस पूर्व ३२६ च्या सुमारास मॅसेडोनियाचा महान सेनानी अलेक्झांडर द ग्रेट याने आपल्या जग जिंकायच्या मोहिमे अंतर्गत भारतावर आक्रमण केले. भारताचा वायव्य प्रांत ग्रीक अधिपत्याखाली आला. भारतावरील परकिय आक्रमणांची नांदी अलेक्झांडर च्या आक्रमणानिमित्त झाली. झेलम नदीच्या लढाईत त्याने पोरस राजाचा पराभव केला परंतु अलेक्झांडरला बरेच नुकसान सहन करावे लागले. पुढील एका लहान लढाईत अलेक्झांडर चांगलाच जखमी झाला होता. ११ वर्षांच्या सातत्याचा लढाईंमुळे अलेक्झांडरची सेना चांगलीच कंटाळली होती व तत्कालीन मगध साम्राज्याची ताकद अलेक्झांडरच्या सैन्याच्या तुलनेत जास्त होती व भारतीयांशी पहिल्या काही लढायातील अनुभवांमुळे मगधशी टक्कर महाग पडेल या कल्पनेने अलेक्झांडरच्या सैन्यात परतीची लाट उफाळून आली. सैन्यात फूट उफाळू नये यासाठी अलेक्झांडरने परतीचा निर्णय घेतला. अलेक्झांडर परतीच्या प्रवासात आजारपणाने मरण पावला त्याचे साम्राज्य त्याच्या सेनापतींनी वाटून घेतले. अलेक्झांडरने भारताचा थोडाच भाग जिंकला असला तरी त्याच्या आक्रमणाने भारतात मोठी राजकीय उथलपलथ झाली.
मौर्य साम्राज्य
मुख्य पान: मौर्य साम्राज्य
अलेक्झांडरचे आक्रमण काळात मगध मध्ये नंद घराण्याची सत्ता होती. नंद वंशाच्या काळात मगधमध्ये असंतोष व राजकीय अस्थैर्यता वाढली होती. चंद्रगुप्त मौर्यने मगध साम्राज्याचे शासक नंद घराण्याचा पराभव केला व इसपूर्व ३२१ मध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चंद्रगुप्तने अलेक्झांडरचा सेनापती सेक्युलस निकेटरचा पराभव करून ग्रीकांचे वर्चस्व संपुष्टात आणले. चंद्रगुप्त मौर्यने भारताचा मोठा भूभाग मौर्य साम्राज्याचा अधिपत्या खाली आणला, तो विस्तार बिन्दुसारच्या काळात चालू राहिला व सम्राट अशोकच्या काळात (इसपूर्व २७३ ते २३२) त्या विस्ताराने कळस केला. जवळपास संपूर्ण भारत, पाकिस्तान, अफगणिस्तान, बांग्लादेश, इराण व ब्रम्हदेशाचा काही भाग इतका मोठ्या भूभाग मौर्य साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला होता. इस. २६० मध्ये झालेल्या कलिंगच्या युद्धात अशोकने कलिंग देश मौर्य साम्राज्याला जोडला परंतु झालेली मानवहानी पाहून त्याचे मन विरक्त झाले व त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला, तसेच त्याने बौद्ध धर्माच्या प्रसारकाचे काम हाती घेतले. बौद्ध धर्माचा जगभर प्रसार होण्यास अशोकाचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती. तर विदीशा, उज्जैन, तक्षशिला ही प्रमुख शहरे होती. अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या कानाकोपऱ्यात पहावयास मिळतात, तसेच अनेक स्तूप आजही पहायला मिळतात, सारनाथ येथील अशोकस्तंभ आज आधुनिक भारताची राजमुद्रा बनली आहे. सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्य हळूहळू क्षीण होत गेले व अशोकानंतर ६० वर्षातच लयाला गेले. शेवटचा मौय सम्राट बृहद्त्त याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने वध केला व मौर्य साम्राज्याचा अंत झाला.
शुंग, शक आणि सातवाहन
मुख्य पान शुंग वंश, शक राज्यकर्ते ,सातवाहन
मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर उत्तर भारतावर शुंग वंश, पश्चिमेला शक राज्य् व दक्षिणेला सातवाहनांचे प्राबल्य होते. भारताच्या वायव्य प्रांत व अफगणिस्तानवर ग्रीक राज्य कर्त्यांनी पुन्हा वर्चस्व मिळवले परंतु कालांतराने ते भारतीय संस्कृतीत सरमिसळून गेले. मौर्य साम्राज्याचा शेवटचा सम्राट बृहदत्त याचा पुष्यमित्र शुंग ने वध केला व स्वता: सम्राट बनला, त्याच्या राज्यकालात त्याने मागील शतकात बौद्ध धर्माचे वाढलेले प्रस्थ कमी करण्याचा प्रयत्न केला व सनातन वैदिक धर्माला चालना दिली. त्याने अनेक बौद्ध स्तूपांची नासधूस केली व बौद्ध धर्मियांना मिळणाऱ्या सवलती बंद केल्या. अनेक ग्रीकांच्या वसाहतींवर आक्रमणे करून त्याने त्यांना हूसकून लावले. पुश्यमित्रच्या पुढील पीढ्यांनी पुष्यमित्रच्या अनेक कुकर्मांची भरपाई करन धार्मिक शांतता टिकवून ठेवली.
मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ख्रि.पू २३०- २२५ पर्यंत दक्षिण भारतातील मोठ्या भागावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरित झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ रोजी महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र शातकर्णी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू शालिवाहन शक आजही रूढ आहे.
याच काळात शक राज्यकर्त्यांनी पश्चिम भागावर नियंत्रण मिळवले होते. शक हे मूळचे मध्य अशियातील लोक होते.
ग्रीक-कुशाण राज्ये
भारतीय-ग्रीक राज्यकर्ता डेमेट्रीयस पहिला इस पूर्व २०५ ते १७१
अलेक्झांडरच्या म्रुत्यूनंतर त्याचे साम्राज्य त्याच्या सेनापतींनी वाटून घेतले. भारतावरील त्यांची पकड मौर्य साम्राज्य काळातच ढिली पडली. परंतु भारताशेजारील देशांमध्ये त्यांनी पकड एकदम मजबूत ठेवली होती. पर्शिया (इराण) व बॅक्ट्रीया (अफगणिस्तान) मध्ये ग्रीक राज्ये भरभराटीस आली. मौर्य साम्राज्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबध होते असे दिसते. या राज्यांमध्ये ग्रीक-भारतीय अश्या प्रकारची मिश्र संस्कृती उदयास आली व याच काळात भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला वायव्य प्रांत सांस्कृतीक दृष्ट्या वेगळा बनू लागला. डेमेट्रीयस या ग्रीक राजाने इसपूर्व १८० मध्ये भारतीय-ग्रीक राज्याची स्थापना केली. या राज्याचा विस्तार अफगणिस्तान, पाकिस्तान, पंजाब प्रांतापर्यंत होता. ही ग्रीक राज्ये २ शतकापर्यंत टिकली. या काळात ३० पेक्षा अधीक ग्रीक राज्यकर्तांनी राज्ये केली. ही राज्ये एकमेकांशी तसेच भारतीय राज्यकर्त्यांशी लढत. मिलींद अथवा मिनँडर हा एक महान ग्रीक भारतीय राज्यकर्ता होऊन गेला. ग्रीक राज्यकर्त्यांनंतर इसपूर्व शतकात या भागात शक राज्यकर्त्यांचे वर्चस्व वाढले. शक हे मूळतः दक्षिण सायबेरीयातून स्थलांतरित लोक होते. सर्वप्रथम बॅक्ट्रीय (अफगणिस्तान), काश्मीर, गांधार, पंजाब असा प्रवास करत भारतात शक टोळ्यांनी प्रवेश केला व पश्चिम भागात आपले प्रस्थ वाढवले. यानंतरच्या काळात कुशाण हे वायव्य भागात प्रभावी बनले कुशाण राज्यकर्त्यांचा एके काळी कझाकस्तानपासून ते मथुरेपर्यंत राज्य होते.
भारतीयांचा पाश्चिमात्य जगाशी व्यापार
दक्षिण भारतातील पुड्डूकोटाई येथे सापडलेले रोमन नाणे
पहिल्या शतकात रोमन सम्राट ऑगस्टस याच्या काळात रोमन साम्राज्याशी व्यापार सुरू झाला. रोमचे साम्राज्य हे भारताचे पश्चिमेकडील सर्वांत मोठे व्यापारी भागीदार होते.
इस १३० मध्ये सूरु झालेला व्यापार पुढे वाढतच राहिला. हा व्यापार मुख्यत्वे रोमशी सरळपणे न होता, अरब इजिप्त या मधल्या व्यापारां मार्फत होत असे. (II.5.12.[२२]), ऑगस्टस या रोमन सम्राटाच्या काळापर्यंत प्रतिवर्षी १२० जहाजे मायोस होर्मोस पासुन ते भारतापर्यंत ये जा करत. या काळात येणाऱ्या सोन्याचा उपयोग भारतीय राज्यकर्त्यांनी आपल्या नावाच्या सोन्याच्या मोहऱ्या पाडण्यात केलेला दिसतो.
“India, China and the Arabian peninsula take one hundred million sesterces from our empire per annum at a conservative estimate: that is what our luxuries and women cost us. For what percentage of these imports is intended for sacrifices to the gods or the spirits of the dead?”
—Pliny, Historia Naturae 12.41.84.[२३]
पूर्व मध्ययुगीन राज्ये
गुप्त साम्राज्य
मुख्य पान गुप्त साम्राज्य
गुप्त साम्राज्याचा काळ हा भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. या काळात भारतात बराच काळ राजकिय, आर्थिक सामाजिक व लष्करी स्थैर्य लाभले. याकाळात भारताने गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य, कला, स्थापत्य इत्यादी क्षेत्रात मोठी मजल मारली. गुप्त साम्राज्याच्या शासकांनी आपल्या सैन्य शक्ती च्या जोरावर भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले. श्रीगुप्त या गुप्त राज्यकर्त्याने गुप्त राज्याची स्थापना केली त्यानंतर काही वर्षातच चंद्रगुप्त ने गुप्त राज्याचे साम्राज्य बनवले. समुद्रगुप्त चंद्रगुप्त विक्रमादित्य यांसारख्या महान राज्यकर्त्यांनी गुप्त साम्राज्य वाढवले. गुप्त साम्राज्याचा कार्यकाल इस २४० ते ५५० पर्यंत मानला जातो. कालिदास हा महान कवी गुप्त सम्राटांच्या दरबारी होता असे मानतात. पुराणांची रचना याच काळात झाली असेही मानतात. गुप्त साम्राज्याच्या नंतरच्या काळात पश्चिम अशियातील हूण आक्रमकांनी केलेल्या आक्रमणांनी गुप्त साम्राज्य क्षीण झाले.
मध्ययुगीन भारत
गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौज च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली. त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली. १३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले. आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते. या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या. प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले. प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओ़ळखली जात, त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.
कनौज त्रिकोण हा तीन साम्राज्यांचा केंद्रबिंदू होता. – दख्खनचे राष्ट्रकूट, माळव्याचे प्रतिहार, व बंगालचे पाल साम्राज्य
या राजपूत राज्यांनी उत्तर भारतातील मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली. भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली.
या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता. चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती. आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती. अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला. चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले. राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली. या काळात दक्षिण भारतातील राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले.[२४][२५] १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली. या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले.
उत्तर मध्ययुगीन राज्ये
गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर उत्तर व दक्षिण भारतात अनेक हिंदू साम्राज्ये उदयास आली. उत्तरेस प्रतिहार,पाल,वर्धन,गहडवाल इत्यादी तर दक्षिणेस राष्ट्रकूट,होयसळ,पांड्य,चेर,कदंब,यादव इत्यादी साम्राज्ये होऊन गेली.
इस्लामी आक्रमणे व राज्ये
Gol Gumbaz at Bijapur, has the second largest pre-modern dome in the world after the Byzantine Hagia Sophia.
मुख्य पान: Islamic Empires in India
अरबस्तानात सहाव्या शतकातील इस्लामच्या उदयानंतर इस्लामी राज्यकर्त्यांनी स्पेन, उत्तर अफ्रिका, तुर्कस्तान ते इराण बलुचिस्तानपर्यंत भाग इस्लामय करून टाकला होता. उमय्यद खलीफाच्या काळात बिन कासीमने सिंध प्रांतात आक्रमण केले व भारतात इस्लामी राज्याची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात इस्लामी आक्रमकांना प्रतिहारीं कडून मोठ्या पराभवाची चव चाखावी लागली त्यामुळे इस्लामी राज्याचा पूर्वेकडचा विस्तार थांबला. परंतु भारताशेजारील इराण तोवर पूर्णपणे इस्लाममय झाला होता. शेजारील (भारत) संपन्न व गैर इस्लामी राज्य आक्रमणासाठी खूणवत होते. दहाव्या शतकात इस्लामी आक्रमणांची व्याप्ति वाढली व भारतात लहान इस्लामी सल्तनते तयार होउ लागली. या आक्रमणांच्या आगोदरही भारतात अरबी व्यापार्यामार्फत इस्लाम पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात पोहोचला होता. सुरुवातीची इस्लामी आक्रमणे प्रामुख्याने लूटीवर आधारित होती. या लूटींचे मुख्य लक्ष्य मंदिरे व संपन्न शहरे होती. गझनीचा महमूदने भारतावर लूटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या.
दिल्ली सल्तनत
कुतुबमिनार
मुख्य पान: दिल्ली सल्तनत
१२ व्या शतकात पृथ्वीराज चौहानचा मोहम्मद घौरीने पराभव केला व भारतात अधीकृतरित्या इस्लामी राजवट सूरु झाली. मोहम्मद घौरीने आपल्या तुर्की गुलामांना राज्यकर्ते बनवले व उत्तर भारतावर गुलाम घराण्याची सत्ता राहिली.[२६] भारताच्या मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट आली, त्यामुळे भारतीय संस्कृतीत इस्लामी सरमिसळ या काळात सुरू झाली. त्यामुळे अनेक सामाजिक बदल भारतात घडून आले. भारतीय स्थापत्य शैली, संगीत व भाषेवर खूप मोठा इस्लामी प्रभाव दिसून येतो तो या काळात रुजला होता. दिल्ली सल्तनतीत कोणत्याही घराण्याला मोठा काळ प्रभुत्व गाजवता आले नाही. एकूण ३०० वर्षांच्या राजवटीत ५ ते ६ घराण्यांनी दिल्ली सल्तनतीत राज्ये केली. ही सर्व घराणी प्रामुख्याने इस्लामी होती. खिल्जी घराण्याने भारतभर मोहिमा काढून भारतातील अनेक हिंदू राज्ये नष्ट केली. तसेच काही राज्यकर्त्यांनी लोकोपयोगी कामे करून चांगला हातभार लावला. शेरशहा सूरी ने बांधलेला कलकत्ता काबूल रस्ता आजही वापरात आहे. दिल्ली सल्तनतीने भारताला मंगोल आक्रमकांपासून थोडाफार बचाव केला. बहुतेक दिल्ली सल्तनतील घराण्यांचे लष्करी बळ मंगोल आक्रमकांचा सामना करण्यात गेले. तरीही तैमूरलंगच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यात दिल्ली सल्तनतीला अपयश आले.
१४ व्या शतकाच्या शेवटी १३९८ मध्ये उत्तरभारतावर कझाकस्तानातील तैमूरलंग या मंगोल आक्रमकाने जबरदस्त आक्रमण केले. तैमूरलंगच्या आक्रमणापुढे तुघलकांचा मोठा पराभव झाला व १७ डिसेंबर १३९८ रोजी दिल्ली तैमूरच्या हाती पडली. तैमूरने दिल्लीमध्ये जाळपोळ लूटमार आरंभली व मोठ्या प्रमाणावर हिंदूची कत्तल केली. हे तत्कालीन इतिहासातील मोठे मानवी शिरकाण समजले जाते.[२७] त्याच्या सैन्यानी कित्येक दिवसांपर्यंत लुट केली व असे मानतात की १ लाख हिंदूंची एका दिवसात सामुहिक हत्या करण्यात आली.[२८] तैमूरलंग च्या आक्रमणानंतर दिल्ली सल्तनतील तुघलक घराण्याची सत्ता संपुष्टात आली. उत्तर भारतात अनेक लहान सहान इस्लामी नवाबी संस्थाने उदयास आली. अवध, लखनौ, बंगाल येथे अशी सस्थांने होती. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला दक्षिणेतील विजयनगर साम्राज्य संपुष्टात आले व दक्षिण भारतात अनेक शाही उदयास आल्या. अहमदनगर येथे निजाम शाही, विजापूर येथील अदिलशाही व गोळकोंडा येथील कुतुबशाही. जवळपास संपूर्ण भारतावर इस्लामी राजवट सूरु झाली. १५२६ मध्ये बाबर या कझाक आक्रमकाने दिल्ली सल्तनतीचा पानिपतच्या पहिल्या लढाईत पराभव केला व दिल्ली सल्तनत संपुष्टात आणली व मुघल साम्राज्याचा पाया घातला.
मुघल साम्राज्य
मुघल साम्राज्याचा १७ व्या शतकातील विस्तार
ताजमहाल,मुघल स्थापत्याचे उत्कृष्ट उदाहरण
मुख्य पान: मुघल साम्राज्य
हेसुद्धा पाहा: बाबर, हूमायूं, अकबर, जहांगीर, शाहजहाँ, आणि औरंगजेब
इस. १५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबर जो कझाकस्तानातील तैमूर-मंगोल वंशातील होता त्याने दिल्ली सल्तनतीवर आक्रमण केले. पानिपतच्या पहिल्या लढाईत लोधींचा पराभव झाला व मुघल साम्राज्याची स्थापना झाली जे पुढील २०० वर्षे टिकले व भारतीय इतिहासातील एक प्रभावी साम्राज्य बनले.[२९] मुघल साम्राज्याने १७ व्या शतकात भारताच्या बहुतेक भागावर राज्य केले व १७०७ नंतर औरंगजेबच्या म्रुत्यूनंतर या साम्राज्याची घसरण चालू झाली सरतेशेवटी १८५७ पर्यंत एका लहान संस्थानिकाचा आकारा पर्यंत मर्यादित राहून टिकली. १८५७ मध्ये ब्रिटीशांनी मुघल राज्य खालसा करून टाकले. या काळात उत्तर भारतात मोगलांचे व दक्षिण भारतात विविध शाहींची राज्ये होती. १६८८ पर्यंत मोघलांच्या राज्याचा विस्तार प्राचीन मौर्य साम्राज्याच्या विस्ताराऐवढा होता. दिल्ली सल्तनतींच्या तुलनेत मुघल साम्राज्याने धार्मिक सलोखा ठेवला. यात सम्राट अकबरने पुढाकार घेतला होता. त्याने स्वता:ही दिन-ए-इलाही हा धर्मही चालू केला होता. तसेच हिंदूंवर लादला जाणारा झिजीया करही माफ करून टाकला होता. मोगलांनी भारतीय स्थापत्यामध्ये परिवर्तन आणले व आजच्या भारतीय स्थापत्याची ओळख प्रामुख्याने मुघली स्थापत्यावरुन होते. जगप्रसिद्ध ताजमहाल मोघल सम्राट शहाजहाँने बांधला तसेच फत्तेपूर सिक्री हे पूर्ण शहर वसवले. दिल्ली व आग्रामधील मधील बहुतेक जुन्या वास्तू या मोघल स्थापत्याची ओळख करून देतात. हिंदूच्या बरोबर सलोखा वाढवला तरीही शाहजहाँ व औरंगजेबच्या काळात हा धार्मिक सलोखा खालवला. औरंगजेबने हिंदूंविषयी दाखवलेल्या कडवट धोरणांमुळे मराठे, राजपूत व शीख दुखावले व मुघल राज्याविरुद्ध बंडाळी वाढली व मुघल साम्राज्याचे पतन होण्यास कारणीभूत ठरले. खासकरुन शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याकडून मोठा प्रतिकार झाला. औरंगजेबने आपल्या आयुष्याची शेवटची २७ वर्षे मराठ्यांचे साम्राज्य नष्ट करण्यात घालवली जे साध्य झाले नाही. औरंगजेबच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचा विस्तार वाढला व मोघलांचा क्षीण झाला व दिल्ली आग्रापुरते त्यांचे राज्य मर्यादित राहिले हा काळ मुघलांच्या दृष्टीने खूपच अस्थैर्याचा राहिला. ५० वर्षांच्या काळात १७ मुघल राजे होऊन गेले. .[३०]
मराठा साम्राज्य
मुख्य पान: मराठा साम्राज्य
१७ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर इस्लामी राज्यकर्त्यांचे वर्चस्व झाले होते. अनेक राजपूत हिंदू संस्थाने अस्तित्वात असली तरी मुघलराज्यकर्त्यांना अंकित होती. महाराष्ट्रातही मराठा सरदार हे निजाम व अदिलशाही पदरी काम करत. या परिस्थितीत १६४७ मध्ये महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी परकिय राज्यकर्त्यांचे वर्चस्व झुगारुन देउन पुण्या जवळील किल्यांवर स्वतंत्र राज्याची स्थापना केली जे पुढे मराठा साम्राज्य म्हणून विकसित झाले. मराठा राज्याची सुरुवात मोघल व अदिलशाहीशी सघर्षरत राहिला. शिवाजी महराजांच्या प्रभावी नेतृत्वाखाली मराठी सेनेने अदिलशाहीचे वर्चस्व नमवले व मोघलांशी उघड-उघड वैर पत्करले. मोघलांशी झालेल्या पहिल्या मोठ्या युद्धात शिवाजी महाराजांनी मुघल सेनापती जयसिंग यांच्याबरोबर तह केला व आग्रा येथे औरंगजेब शी बैठकीचे निमंत्रण मान्य केले. औरंगजेबशी झालेल्या भेटीत औरंगजेबने शिवाजींचा अपमान केला व नजरकैदेत ठेवले. या कैदेतून शिवाजींनी सहिसलामत सुटका करून घेतली जी औरंगजेबच्या जिव्हारी लागली. १६७४ मध्ये शिवाजींनी अधीकृतरित्या राज्याभिषेक करवून घेउन मराठा साम्राज्याची स्थापना केली. १६८० मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर काही अस्थिर काळानंतर संभाजी महाराजांनी राज्यकारभाराची सुत्रे घेतली. परंतु औरंगजेबने मराठा राज्य संपवायचा निर्णय घेतला व सर्वशक्तीनीशी दक्षिणेत आला. १६८९ मध्ये संभाजी महाराजांना अटक करण्यात औरंगजेबला यश आहे व अतिशय मानहानी करून संभाजी महाराजांची हत्या केली. यानंतर राजाराम महाराजांनी सुत्रे घेतली व दक्षिणेत जिंजी येथून औरंगजेब विरुद्ध लढा चालू ठेवला. १७०७ पर्यंत मराठ्यांनी अतिशय चिकाटीने हा लढा चालू ठेवत मुघल साम्राज्याचा पायाच खिळखिळा केला. १७०७ मध्ये औरंगजेबच्या म्रुत्यूनंतर हा लढा संपला पण तोपर्यंत मराठ्यांनी विस्तार सुरू केला होता व मुघलांची उत्तर भारतातून माघार सुरू झाली. यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार सूरु झाला भोसले घराणे अधीकृतरित्या राज्यकर्ते असले तरी खरी सुत्रे पेशव्यांच्या कडे आली. पहिला बाजीराव, शिंदे व होळकरांनी मिळून भारताचा मोठा भूभाग मराठ्यांच्या अख्यात्यारित आणला. १७६१ मध्ये झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत पेशव्यांचा दारुण पराभव झाला व साम्राज्याचे पतन चालू झाले. यामुळे इंग्रजांचे चांगलेच फावले व त्यांनी विस्तार चालू केला. १७७७ ते १८१८ पर्यंत इंग्रजांशी तीन युद्धे झाली व शेवटी १८१८ मध्ये दुसऱ्या बाजीरावचा पराभव झाल्यानंतर मराठा साम्राज्याचा अंत झाला.
युरोपीयन वसाहत युग
ऑटोमन साम्राज्याने भारताशी व्यापाराचे मार्ग बंद केल्यानंतर अनेक धाडशी दर्यावर्दींनी भारताला मार्ग शोधण्याचे प्रयत्न सूरु केले. या प्रयत्नात अमेरिका खंडाचा शोध लागला, वास्को दा गामाने दक्षिण अफ्रिकेहून वळसा घालून भारताला येण्याचा मार्ग शोधला व युरोपीयन साम्राज्य वाद सूरु झाला असे मानतात. पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रजांनी भारताशी व्यापार करण्यात रस दाखवला. सुरुवातीला १६ व्या शतकात या युरोपीयन देशांनी मुघल व इतर स्थानिक राज्यकर्त्यांकडून व्यापारी सवलती मिळवल्या. नंतर आपल्या व्यापारी मालाचे संरक्षण व वाहतुकीसाठी व्यवस्था म्हणून यांनी भारताच्या किनाऱ्या वर अनेक ठिकाणी वखारी व लहान किल्ले उभारले. उदा. पोर्तुगीजांनी गोवा दीव दमण येथे तर इंग्रजांनी मुंबई व सुरत येथे आपली केंद्रे स्थापिली होती. भारतीय राज्य कर्त्यांना आधुनिक शस्त्रास्त्रे व युद्धतंत्रे देण्यात इंग्रज व फ्रेंचांमध्ये चढाओढ चालली होती. या प्रयत्नात इंग्रज फ्रेंच यांच्यात स्पर्धा तीर्व होती. संरक्षणाच्या नावाखाली छोट्या छोट्या क्षेत्रावर नियंत्रण मिळवले. १७५७ मध्ये प्लासी येथे झालेल्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला त्यामुळे प्रथमच युरोपीयांना मोठ्या भागावर राज्य करायला मिळाले व त्यानंतर विस्तार धोरण चालू ठेवले. पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांचे सत्ताकेंद्र विभागले याचा चांगलाहच फायदा इंग्रजांनी घेतला. प्रमुख संस्थानिकांच्या राज्यकारभारात हस्तक्षेप करून त्यांनी वर्चस्व मिळवायला चालू केले. या राज्यांना एकमेकांविरुद्ध लढण्यास तैनाती फौजेची आमिषे दिली अश्या रितीने फोडा व राज्य करा या नीतीचा वापर केला. मराठे व म्हैसूर चा टिपू सुलतान यांच्याशी युद्धे करून ती राज्ये संपवली व १८१८ पर्यंत भारताच्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळवले. इंग्रजांची आधुनिक युद्धतंत्र व शस्त्रात्रे यांचा सामना करण्यात भारतीयांना सपशेल अपयश आले.
स्वतंत्र भारत चळवळ
१८१८ मध्ये मराठ्यांचे राज्य संपुष्टात आणल्यावर ब्रिटीशांची भारताच्या मोठ्या भागावर सत्ता स्थापन झाली.
स्वातंत्र्य, फाळणी
अखंड भारताची फाळणी होऊन पाकिस्तान हे स्वतंत्र मुस्लिमबहुल राष्ट्र अस्तित्वात आले. १४ अॉगस्ट १९४७ रोजी पाकिस्तानला व दुसऱ्या दिवशी १५ अॉगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आले. पाकिस्तान हे राष्ट्र पश्चिम(आजचा पाकिस्तान) व पूर्व अशा भागात विभागले होते .१९७१साली भारताच्या पाठिंब्याने पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला व त्याचे बांगलादेश असे नामकरण झाले .
स्वतंत्र भारत
ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अस्तित्वात आले. हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणून ओळखला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु होते तर पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे होते. १९५२ मध्ये पहिल्या सार्वजनिक निवडणुका पार पडल्या. तेव्हा भारत सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र झाले. १९५५ ते १९६० मध्ये भाषावार प्रांतरचनेचा आग्रह भारताच्या बहुतेक सर्व भागातून होऊ लागला. आंदोलने व जनाग्रहास्तवामुळे भारताची भाषावार प्रांतरचना झाली. पंडित नेहरुंच्या नेतृत्वाखाली भारताने साम्यवादाशी मिळतीजुळती अर्थव्यवस्था स्वीकारली. पंचवार्षिक योजनांनी नियोजन करून भारताने स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये धरणे, रस्ते व लोह पोलादांचे उद्योग यांना प्रोत्साहन दिले. हरितक्रांतीवर जोर देऊन भारताचे अन्न धान्याबाबतीत परावलंबन कमी करण्याचा प्रयत्न केला. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. या युद्धाचा धडा घेउन भारताने यानंतर लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर दिला. यानंतर १९६५मध्ये पाकिस्तानने आक्रमण केल्यावर भारताने पाकिस्तानचा पराभव केला. बांगलादेशातील घडामोडींमुळे १९७१मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात पाकिस्तानचा निर्णायक पराभव करून स्वंतत्र बांगलादेशची निर्मिती केली.
१९६६ नंतरची १८ वर्षे भारतीय राजकारणावर इंदिरा गांधींचे वर्चस्व राहिले. १९७५-७६ मध्ये इंदिरा गांधींनी देशावर दीर्घकाळ आणीबाणी लागू केली त्यामुळे संतप्त जनतेने पुढील निवडणुकीत काँग्रेसच्या अबाधित सत्तेला धक्का दिला व भारतीय राजकारणात नवीन पर्व चालू झाले. पाकिस्तानने बांगलादेशच्या पराभवानंतर छुपे दहशतवादी युद्ध भारताबरोबर करण्यास आरंभ केला. १९७० च्या दशकात प्रामुख्याने पंजाब व इतर राज्यातील फुटीरवादी चळवळींना प्रोत्साहन दिले. पंजाबातील दहशतवाद संपविण्यासाठी १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार ही कारवाई करुन अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना हुसकून लावले गेले. यानंतर काही काळातच इंदिरा गांधींची हत्या झाली. भारताला सवतॠ हिटलरमुळे मिळाल॓. इंदिरा गांधींनंतर राजीव गांधींनी सहानभूतीपोटी निवडणूकीत अभूतपूर्व यश मिळवले, स्थिर सत्तेच्या जोरावर भारतात इलेक्ट्रॉनिक क्रांती आणण्याचा प्रयत्न केला. श्रीलंका व मालदीव मधील हस्तक्षेपामुळे १९९१ मध्ये तमिळ दहशतवाद्यांनी राजीव गांधींची हत्या केली. १९८९ पर्यंत पंजाबमधील दहशतवाद नियंत्रणात आला परंतु काश्मीरमधील फुटीरतावादी दहशतवादी चळवळ सक्रीय झाली व ९० च्या दकशकात मुख्यत्वे ग्रासले. १९९२ मध्ये हिंदुत्वावर आधारित राजकीय पक्षांनी रामजन्मभूमीचा शतकानुशतके चाललेला विवादाला तोंड फोडले व त्याची परिणीती बाबरी मशीदीच्या विध्वंसात झाली.
१९९1 मध्ये भारतीय सरकारने गॅट-करारावर स्वाक्षरी करून खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. यामुळे दबलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी मिळाली व काही वर्षांमध्येच भारताने आर्थिक स्थिती सुधारुन सक्षम अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली.
भारताच्या भूगोलाचा अतुलनीय इतिहास (मूळ इंग्रजी लेखक – संजीव सान्याल; मराठी अनुवाद – सायली गोडसे).
“Introduction to the Ancient Indus Valley” (इंग्लिश मजकूर).
डिस्कवरी ऑफ इंडिया-ले. पंडित जवाहरलाल नेहरु
भारतीय संस्कृती कोश खंड नववा.
———————————————————————————————————————