खारघर कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर सेक्टर ३५ येथील येथील हाईड पार्क सोसायटीने एसटीपी अर्थात सांड-पाणी आणि मलनिसारण प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पाद्वारे दररोज ५ लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. पनवेल महापालिका क्षेत्रातील सोसायटीने केलेला हा पहिला प्रकल्प आहे. मनपा आयुक्त डॉ गणेश देशमुख यांनी हाईड पार्क सोसायटीच्या या प्रकल्पाचे कौतुक केले.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याचा वापर योग्य आणि जपून करावा , या उद्देशाने सोसायटीच्या वतीने सदर सांड-पाणी आणि मलनिसारण प्रकल्प उभा केल्याची माहिती हाईड पार्क सोसायटीतील रहिवाशी तथा सामाजिक कार्यकर्ते मंगेश रनवडे यांनी दिली. या प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी प्रत्येकाचा टॉयलेट फ्लशिंग साठी वापरले जाते. अतिरिक्त पाणी झाडांना आणि इतर लाद्या धुण्यासाठी वापरले जाते.
अतिरिक्त प्रक्रिया केलेले पाणी अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असते. पनवेल महानगरपालिकेने त्या पाण्याचा उपयोग झाडांना, बांधकामासाठी आणि टॉयलेट फ्लशिंग वापरल्यास महापालिका थोडे का होईना ,पाणी निश्चित बचत करू शकते , असे निवेदन सोसायटीने मनपा आयुक्त डॉ गणेश देशमुख यांना दिले आहे. आयुक्तांनी देखील सोसायटीच्या या स्त्युत्य उपक्रमाचे कौतुक करून सफाईसाठी कंत्राटदारांना हेच पाणी वापरावे असे निर्देश दिले. कंत्राटदार देखील आयुक्तांच्या सूचनांची अमलबजावणी करीत हाईड पार्क सोसायटीने प्रक्रिया केलेले पाणी मागील एक आठवड्यापासून घेत आहेत. या प्रकल्पाद्वारे सोसायटीला उत्पन्नाचा स्रोत देखील मिळाला.
कोकण दर्पण .