नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : राज्यात आणि देशात सरकारकडून जनतेची मुस्कटदाबी, हिटलरशाही सुरु आहे, असा भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल करीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कुणी काय खायचे, काय बोलायचे, काय परिधान करायचे, सर्व गोष्टी यांनीच ठरवायच्या त्यामुळे ही दादागिरी मोडून काढण्यासाठी आता नागरिकांनी फार मोठ्या जबाबदारीने पाऊले उचलण्याची वेळ आली आहे, असे आवाहन करीत या जुलमी सरकारला सत्तेवरुन खाली खेचा, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने काढलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेचा झंझावात शनिवारी नवी मुंबईत पोहोचला या निमित्ताने कोपरखैरणे परिसरातील रा.फ.नाईक शाळेच्या मैदानात नागरिकांच्या तुफान उपस्थितीत जाहिर सभा पार पडली. या सभेत भुजबळ यांनी आपल्या तडाखेबंद शैलीत कधी मिश्किल तर कधी शेरोशायरी करीत शिवसेना आणि भाजपा सरकारचा बुरखा फाडला.
ज्येष्ठ नेते अजितदादा पवार, दिलीप वळसे-पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, लोकनेते गणेश नाईक, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, राज्य महिला अध्यक्षा चित्रा वाघ, प्रवक्ते नवाब मलिक, आमदार हेमंत टकले, खा.वंदनाताई चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार विद्या चव्हाण, प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, पक्षाचे प्रदेश आणि नवी मुंबईतील वरिष्ठ पदाधिकारी, सर्व सेलचे प्रमुख,नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
भुजबळांनी मोदी सरकारला जातीयवादी संबोधताना सत्तेसाठी ते आता जाती धर्मात भांडणे लावण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा दिला. मोदी हे जनतेसोबत मन की बात करतात तर उद्योगपतींसमवेत धन की बात करतात असा टोला लगावला. पंतप्रधान मोंदींची नक्कल करीत निवडणुकीत पराभव अटळ असल्याने यांना आता राम मंदिर आठवल्याची टीका करत इन्हे मंदिर नही, फिर सरकार बनानी है, असा शेर मारत भाजपाला फटकारले.
जातीवादाचे विष, विकासाच्या पोकळ गप्पा – अजित पवार
महाराष्ट्रातील दुष्काळाला शिवसेना-भाजपचे सरकार जबाबदार आहे. या सरकारच्या नुसत्या विकासाच्या गप्पा सुरु आहेत. कुठे आहे विकास, कुठे आहे स्वच्छ भारत, कुठे आहे भ्रष्टाचारमुक्त भारत? असे सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केले. अठरापगड जातींचा हा देश व राज्य आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वाट्टेलते हे सरकार करत आहे. सुरुवातीला जातीजातीमध्ये भांडणे लावली जात होती आणि आता यांनी देवांनाही जातीत विभागायला सुरुवात केली आहे हे गंभीर असून हे रोखले पाहिजे, असे मत देखील पवार यांनी व्यक्त केले. मेक इन आणि स्वच्छ भारत या सरकारच्या योजनांवर टिका करीत पवार यांनी कुठे आहे स्वच्छ भारत? आणि कधी होईल होईल मेक इन इंडिया? असा सवाल उपस्थित केला. दोन कोटी नोकर्या देण्याचे आश्वासन देणार्या मोदी सरकारने नोटाबंदी, जीएसटीमुळे एक कोटी लोकांच्या नोकर्या घालवल्या.
शिवसेना-भाजपा, हे वागणं बरं नव्हं – जयंतराव पाटील
राज्यात गळयात गळे घालून सत्ता भोगणारे सेना-भाजपा हे एकमेकांवर टीका करतात. तर दुसरीकडे युती करण्यासाठी जवळही येतात. हे त्यांचे वागणे म्हणजे नवे नाटक असल्याची टिका करीत शिवसेना-भाजपा, हे वागणं बरं नव्हं, असा टोला प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी मारला. नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून लोकनेते गणेश नाईक हे नवी मुंबईत जो जनहिताचा कारभार करीत आहेत त्याला अच्छे दिन म्हणतात असे गौरवोदगार काढून पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पराभवाचा दणका बसल्यानंतर भाजपा आता पराभवाच्या मानसिकतेते गेली असल्याचे ते म्हणाले. एवढी अब्रू जावूनही शिवसेना भाजपाला सोडायला तयार नाही याचा अर्थ काहीतरी घोटाळा आहे, अशी शंका जनतेला येवू लागल्याची कोपरखळी पाटील यांनी मारली.
राष्ट्रवादीचा विजय निश्चित – लोकनेते गणेश नाईक
लोकनेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईत पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांना अभिप्रेत शहर विकास होत असल्याचे सांगितले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या चुनावी जुमल्यांमुळे पराभव झाला तरी सहा महिन्यानंतर झालेल्या निवडणुकीत नवी मुंबईकरांनी पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता कायम ठेवून शिवसेना-भाजपाला त्यांची जागा दाखविल्याचे ते म्हणाले.आगामी निवडणुकांमध्ये फक्त राष्ट्रवादीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
हे सरकार भ्रष्टाचारी – धनंजय मुंडे
विरोधी पक्षनेते मुंडे यांनी आपल्या खास शैलीत सेना-भाजपा सरकारच्या अपयशाचा समाचार घेतला. सुभाष देसाई, सुभाष देशमुख, पंकजा मुंंडे, प्रकाश मेहता आदीं १६ मंत्रयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देवूनही मुख्यमंत्री त्यांची चौकशी करीत नाहीत. भ्रष्ट मंत्रयांना क्लिन चिट देतात, असा घणाघात मुंंडे यांनी केला. माथाडींना, शेतकर्यांना, नोकरदारांना, युवांना, महिलांना उध्वस्थ करणार्या या सरकारच्या पापाचा घडा भरला असून परिवर्तनाचा निर्धार, अब की बार मोदी की हार, अशी घोषणा मुंडे यांनी केली.
कोकण दर्पण .