खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : सिडको आणि पनवेल महापालिका प्रशासन झोपी गेल्याचा अनुभव मागील अनेक महिन्यापासून घेतल्यानंतर शेवटी खारघर प्रभाग क्रमांक ६ सेक्टर १८ मधील रहिवाशी रस्त्यावर उतरले. सेक्टर १८ जवळील वास्तुविहार सोसायटीकडून डी मार्ट आणि डेली बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यामधील खड्डे श्रमदानातून रहिवाशांनी बुजविले. स्थानिक नगरसेवकांचे देखील या खड्ड्यांकडे मागील अनेक महिन्यांपासून दुर्लक्ष असल्याची प्रतिक्रिया रहिवाशांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.
खारघर सेक्टर १८ जवळील सदर रस्ते मागील अनेक महिन्यांपासून खोदलेले होते. वेगात आलेली गाडी थांबविताना मोठी नामुष्की होत होती. खाड्यांजवळ अचानक थांबलेल्या गाडीमुळे येथे अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. गाडी खड्ड्यात जाऊन वाहन चालकाला देखील मोठा धक्का बसत होता. सिडको आणि पनवेल पालिका प्रशासन काहीतरी करेल अशी रहिवाशाची अपेक्षा होती मात्र प्रशासन आणि नगरसेवकांचे देखील याकडे दुर्लक्ष झाल्याचे रहिवाशांनी सांगितले.
शेवटी खारघर सेक्टर १८ येथील स्वागत सोसायटी आणि सिग्नेचर पॉईंट सोसायटीतील रहिवाशांनी श्रमदान करून खड्डे बुजविले. यामध्ये विनोद पटेल , जगदीश पटेल , धीरज पटेल, सुनील पटेल, सुरज पटेल , अरविंद पटेल , पंकज पटेल, शांतीलाल पटेल, उत्सव पटेल, डॉ भरत पटेल, सुरेश पटेल, जयेश पटेल, करणं पटेल, अरविंद चोपडा ,कल्पेश पटेल आदींचा समावेश होता.
कोकण दर्पण .