Press "Enter" to skip to content

सौरभ चौधरीच्या अपघाती मृत्यूप्रकरणी सर्वस्वी जबाबदार नवी मुंबई महापालिका आयुक्तांवर ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – ऍड. मयुरी पाटील व ऍड. वल्लरी जठार यांची मागणी !

कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखैरणे विभागातील सेक्टर ११ येथे उभारण्यात आलेल्या शाळेचे गेट अंगावर पडून झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ११ वर्षीय सौरभ चौधरी याच्या मृत्यूला सर्वस्वी कारणीभूत असणारे महापालिका आयुक्त , डॉ. रामस्वामी एन., तत्कालीन शहर अभियंता , मोहन डगांवकर, अभियांत्रिकी विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता , शाळा बांधणी संबंधित उपअभियंता , कनिष्ठ अभियंता , इत्यादींवर भारतीय कलम अंतर्गत ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा’ पोलीसांच्या मार्फत दाखल करण्यात यावा. अशी मागणी ऍड. मयुरी पाटील व ऍड. वल्लरी जठार यांनी केली आहे. ते मुंबई मराठी पत्रकार संघ येथील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मागील वर्षी दिनांक २५ मे रोजी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे कोपरखैरणे सेक्टर ११ येथे उभारण्यात आलेल्या शाळेचे स्लायीडिंग गेट अर्थात प्रवेशद्वार अकरा वर्षीय सौरभ चौधरी व त्याच्या मित्रांच्या अंगावर पडून अपघात घडला.ज्यामध्ये, सौरभ चौधरी याचा मृत्यू झाला आणि इतर दोन मुले गंभीर जखमी झाली होती. या अपघाताविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केल्या माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून केला असता, सदर शाळेच्या बांधकामासाठी महापालिकेतर्फे नियुक्त केलेल्या ‘द फर्म’ या आर्किटेक्चर समूहाने मूळ प्लॅनमध्ये ओपन गेट आखून दिल्या / सुचविल्याप्रमाणे बांधकाम करणाऱ्या ‘अश्विनी इन्फ्रा.’ या कंत्राटदाराने तसे न करता स्लायडिंग गेट उभारले असल्याची धक्कादायक बाब समोर आली. तसेच, बांधकांम करणाऱ्या कंत्राटदाराने केलेला हा बदल महापालिकेनेही पडताळून पाहिला नाही अथवा त्यावर आक्षेप घेतला नाही. ज्यामुळे, सौरभला आपला प्राण गमवावा लागला असल्याचा आरोप ऍड. जठार व ऍड. पाटील यांनी केला आहे.

महापालिकेच्या संबंधित यंत्रणेतील अभियंता व अधिकाऱ्यांनी वेळीच या बदलावर आक्षेप घेतला असता तर सौरभ आज जिवंत असला असता. तसेच, शाळेच्या मूळ प्लॅन/आराखड्यामध्ये बांधकाम कंत्राटदाराने केलेला बदल हा महापालिका व कंत्राटदार यांमध्ये कामाचे कार्यदेश देण्याआधी होणाऱ्या कराराचा भंग करणारा ठरला असल्याचा दावा ऍड. जठार व ऍड. पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच, ही शाळा उभारण्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेले आर्किटेक्चर समूह ‘द फर्म’ आणि बांधकाम कंत्राटदार ‘अश्विनी इन्फ्रा.’ हे दोघेही तितकेच जबाबदार असून त्यांना महापालिकेने चालू कामांसोबत काळ्या यादीत टाकावे. जेणेकरून भविष्यात असे अपघात होवून कोणाला आपला जीव गमवावा लागणार नाही. असे परखड मत ऍड. मयुरी पाटील यांनी व्यक्त केले.

त्यामुळे, नवी मुंबई महानगरपालिकेत कार्यक्षेत्रात आणि मुख्यतः महापालिकेच्या वास्तू उभारणी स्थळी घटितय अपघातातील जबादार असणाऱ्या अधिकारी व अभियंतांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. यासाठी, दोन कायदेशीर नोटिसा, महापालिका आयुक्तांशी प्रत्यक्ष भेट व तदनंतर पुनः लेखी निवेदन तसेच नवी मुंबई पोलिसांकडेही फौजदारी कारवाईची लेखी मागणी इत्यादी माध्यमातून ऍड. जठार व ऍड. पाटील यांनी पाठपुरावा केला. मात्र, मृत्यूमुखी पडलेला सौरभ हा कोणा राजकीय अथवा सेलिब्रेटीच्या परिवारातील नसल्यामुळे त्याच्या मृत्यूला कारणीभूत असणारे महापालिका आयुक्त डॉ. रामस्वामी एन., तत्कालीन शहर अभियंता मोहन डगांवकर, कोपरखैरणे अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता, शाळा उभारणी संबंधित तत्कालीन उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता इत्यादींवर अद्यापही फौजदारी अथवा न्यायालयीन कारवाई झाली नसल्याची खंत ऍड. मयुरी पाटील व ऍड. वल्लरी जठार यांनी पत्रकार परिषदे दरम्यान व्यक्त केली आहे.

कोकण दर्पण.