अन्यथा, रक्तरंजित क्रांती घडेल – राजारा पाटील यांचा इशारा !
नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई विमानतळ प्रकल्पबाधित झालेली ११०० कुटुंबं अद्यापि वाऱ्यावरच आहेत. विमानतळ परिसरातील अनेक गावे आपल्याला न्याय मिळेल या आशेने प्रतीक्षा करीत आहे. मात्र , सिडकोच्या आडमुठी धोरणामुळे विमानतळबाधित ११०० कुटुंबांना रस्त्यावर राहण्याची नामुष्की ओढवली आहे. प्रकल्पबाधित कुटुंबांच्या न्यायहक्कच्या लढाईसाठी आता शेतकरी प्रबोधिनी संघटना मैदानात उतरली असून सिडको आणि शासनाविरोधात बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पबाधितांना न्याय देताना सिडकोने अन्याय केल्याचा आरोप शेतकरी प्रबोधनाचे अध्यक्ष तथा प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील यांनी कोकण दर्पणशी बोलताना केला. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी काही ठराविक नेत्यांना हाताशी धरून त्यांच्या सोयीने सर्वे केला. त्यामुळे सर्वेक्षणातून अनेक बाधित गावे वगळली गेली. विमानतळ परिसरातील सिद्धार्थ नगर मध्ये अनेक वर्षांपासून लोकवस्ती आहे. त्यांच्याकडे सर्व पुरावे आहेत, मात्र सिडकोच्या सर्व्हेत सदर गावे कशी दिसली नाहीत असा प्रश्न राजाराम पाटील यांनी उपस्थित केला आहे. मच्छिमारी करणाऱ्या कोळी बांधवांवर मोठे संकट आले आहे. ओबीसी , आगरी, कोळी , एस्सी एसटी , व्ही जे एन टि अशा सर्वच बहुजन समाजावर अन्याय झाल्याचे राजाराम पाटील यांनी बोलताना नमूद केले.
नवी मुंबई विमानतळ बाधितांना न्याय देताना काही ठराविक नेत्यांच्या सोयीने काण्यात आले असून सिडको अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी राजाराम पाटील यांनी केली आहे.
विमानतळ बाधित सिद्धार्थनगर कोंबडभुजे , दापोली या गावांवर तर मोठे संकट ओढवले आहे. शासनाने , सिडकोने याबाबत गंभीर दखल घेऊन रस्त्यावर आलेल्या कुटुंबांना न्याय द्यावा , अन्यथा रक्तरंजित क्रांती होईल , असा टोकाचा इशारा राजाराम पाटील यांनी दिला आहे.
कोकण दर्पण.





