Press "Enter" to skip to content

भाजपचा एकला चलो नारा ! आगामी निवडणुका स्वबळावर लढणार ! भाजप संघर्षाच्या भूमिकेत, जनतेच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करणार !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन अनैतिकरीत्या सरकार स्थापन केले आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजप- शिवसेना युतीला दिलेल्या जनाधाराचा हा विश्वासघात आहे. महाराष्टरातील जनता त्यांना कदापि माफ करणार नाही, अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. आगामी काळात येणाऱ्या निवडणुका भाजप स्वतंत्रपणे स्वबळावर लढेल, असे म्हणत नड्डा यांनी एकला चलोचा नारा दिला. भविष्यातील निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटन बांधणीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. नवी मुंबईत आयोजित केलेल्या राज्य परिषदेत जे पी नड्डा बोलत होते.

महाराष्ट्रातील सत्ता हातातून गेल्यानंतर भाजपची पुढील भूमिका आणि दिशा निश्चित करण्यासाठी रविवारी स्वर्गीय राम कापसे नगर नेरुळ नवी मुंबई येथे भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले. यावेळी भाजपचे भाजपचे केंद्रीय अध्यक्ष नड्डा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नड्डा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला केला. केंद्रातील भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत बोलताना नड्डा यांनी मोदी सरकारचे कौतुक केले.नागरिकत्व सुधारणा कायदा, ट्रिपल तलाक , कलम ३७०, अभिव्यक्ती स्वतंत्र, ओबीसी आयोग , एस्सी एसटी आरक्षणाला मुदत वाढ , सर्जिकल स्ट्राईक , राम मंदिर आदी मुद्यांवर केंद्रातील आपल्या सरकारची पाठ थोपटली.

देशात सर्वाधिक लोकप्रतिनिधी असलेला भाजप हा जगातला सर्वाधिक सदस्यता असलेला पक्ष आहे. देशातले काँग्रेस, शिवसेना , बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी आणि इतर पक्ष हे पारिवारिक आणि वंशाशी केंद्रित असलेले पक्ष आहेत. मात्र भाजप हा विचार आणि संघटनेच्या आधारावर उभा असलेला पक्ष आहे. भाजप पक्ष एक परिवार आहे. इथे सामान्य कार्यकर्त्याला पंतप्रधान आणि केंद्रीय अध्यक्ष बनण्याची संधी आहे असे सांगून नड्डा यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधून नड्डा म्हणाले, काँग्रेस पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान केला , मात्र राजा मौन बाळगून बसला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेच्या महत्वकांक्षेपायी हे सगळे खपवून घेतले जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर असे होऊ दिले नसते , असा टोला देखील नड्डा यांनी यावेळी लगावला. मागील पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला विकासाची दिशा दिली, असे देखील नड्डा यांनी प्रतिपादित केले.
भविष्यात भाजपला अधिक सक्षम बनविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा, असे आवाहन नड्डा यांनी केले. संघटन मजबूत झाले कि पुढील निवडणुका भाजप स्वतंत्रपणे लढून स्वबळावर जिंकू शकते, आगामी नवी मुंबई महापालिका आणि औरंगाबाद निवडणूका भाजप स्वबळावर जिंकेल, असा विश्वास नड्डा यांनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार उदयनराजे भोसले ,माजी प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायक सहस्त्रबुध्ये , प्रदेश प्रभारी सरोज पांडे, राष्ट्रीय सहसंघटक व्ही सतीश ,राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, राष्ट्रीय महिला अध्यक्षा विजयाताई राह्तकर ,माजी मुख्यमंत्री नारायण राणे , माजी मंत्री गणेश नाईक ,माजी मंत्री एकनाथ खडसे ,माजी मंत्री पंकजा मुंडे, भाजप नेते विनोद तावडे, ऍड आशिष शेलार , डॉ संजय कुटे, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात,आमदार मंदाताई म्हात्रे, जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह अनके प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रामध्ये जनाधाराचा अपमान करून शिवसेनेने जनतेच्या पाठीत खंजीर खुपसले. स्वतःला मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री बनविण्यासाठी उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षांसोबत जाऊन सरकार बनविले असा आरोप यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढून देखील शिवसेनेने अभद्र युती केली. खऱ्या अर्थाने ३० ते ३५ वर्षांची युती तोडून शिवसेनेने दगाफटका केला, असा टोला पाटील यांनी लगावला.खुर्ची आणि सत्तेसाठी शिवसेनेने युतीला गुंडाळले. सरकार पडेल आणि सत्ता येईल याची प्रतीक्षा करीत आता गप्प बसून चालणार नाही. राज्यातील एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करून सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडून सरकारचा खोटारडेपणा उघड्यावर आणण्याचे आवाहन , चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. महिला अत्याचार , झोपडपट्टी पुनर्वसनात पाचशे स्केअर फुटाचे घर देण्याचे आश्वासन देऊन दिशाभूल केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकाबाबत आघाडी सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. जनतेचे प्रश्न सोडविणायसाठी एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरून काम करायचे अणे, अशी भुमीका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मॅच खऱ्या अर्थाने भाजपने जिंकली आहे. आता एका नव्या संघर्षाची सुरुवात झाली आहे. जनादेशाचा विश्वासघात झाला मात्र आता विश्वासघात झाला म्हणून गप्प बसून चालणार नाही. आता लढण्याची आणि नडण्याची वेळ आली आहे आगामी काळात स्वतःच्या ताक्तीवर भाजप सत्ता स्थापन करेल, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा विश्वासघात होतोय , महिला अत्याचार वाढतोय, त्यामुळे आता आपल्याला रस्त्यावर उतरून या सरकारला जागे करावे लागेल. येत्या २२ फेब्रुवारी पासून भाजप रत्स्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »