Press "Enter" to skip to content

नाईक साम्राज्य अडचणीत ! भाजपात गेलेले ७ नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबईतील गणेश नाईक यांचे राजकीय साम्राज्य अडचणीत आले आहे. नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पाडून महापालिकेतील ४९ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश करणाऱ्या आमदार गणेश नाईकांना पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे. भाजपात गेलेले तीन विद्यमान नगरसेवक आणि चार माजी नगरसेवक असे एकूण सात नगरसेवक गुरुवारी राष्ट्रवादीत स्वगृही परतले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात प्रवेश केला.

नवी मुंबईतील विद्यमान नगरसेवक सलुजा सुतार , शुभांगी पाटील, शशिकला पाटील आणि माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, विवेक पाटील, राजू शिंदे , संदीप सुतार यांनी पुन्हा राष्ट्रवादीची कास धरली आहे. राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे आणि नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रवेश प्रक्रिया पार पडली.

मागच्या आठवड्यात गणेश नाईक यांचे तुर्भे येथील खंदे समर्थक असलेले सुरेश कुलकर्णी यांनी अन्य तीन नगरसेवकांसह भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे.  
 
महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी नवी मुंबईचे बादशाह मानले जाणारे आमदार गणेश नाईक यांचे राजकीय वर्चस्व आता अडचणीत आले आहे. नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक जाहीर होण्याअगोदर पासूनच महाराष्ट्र विकास आघाडीने कंबर कसली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने बैठकांचे सत्र सुरू करून निवडणुकीसाठी बांधणी केली. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी नवी मुंबईकडे मोर्चा वळविला. नुकताच झालेल्या महाविकास आघाडीच्या महामेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.
मात्र, यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपात अस्वस्थता वाढू लागली. भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. नवी मुंबईत वाढलेल्या महाविकास आघाडीच्या पप्राबल्यामुळे भाजपात गेलेल्या अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादीत स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज आजी माजी सात नगरसेवकांनी परतीचा मार्ग स्वीकारल्याने भाजपात आणि गणेश नाईक गोटात महापालिका सत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. भाजपात गेलेले आणखी काही नगरसेवक पुन्हा परततील अशी माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी, मूळ गाव आहेत. मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणात आहेत. भाजपची विचारसरणी अनेक प्रभागात चालणारी नाही. मात्र गणेश नाईकांनी आपल्या सोबत सगळ्यांनाच भाजपात आणले. भाजपच्या विचारसरनीशी न जुळलेले सूत आणि महाविकास आघाडीचा बोलबाला यामुळे भाजप गोटात सुरू असलेल्या अस्वस्थतेला काही प्रमाणात मार्ग मिळाला आहे. पुढील काळात आणखी प्रवेश होण्याची शक्यता आहे.
गणेश नाईकांच्या अनेक मातबर नगरसेवकांचे प्रभागात आरक्षण अथवा महिला आरक्षण लागले आहे. सातत्याने नाईक गटाला सुरुंग लागत आहे. अशा परिस्थितीत गणेश नाईक यांचा नवी मुंबई महापालिका गड हातातून निसटण्याची चिन्हे दिसत आहेत.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »