नवी मुंबई, प्रतिनिधी : प्रतिकुल नैसर्गिक परिस्थितीवर मात करून रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण हे प्रकल्प मार्गी लावत असलेल्या कोकण रेल्वेच्या तोंडाला केंद्रातील भाजप सरकारने पाने पुसली आहेत. हजारो कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे काम सुरू असताना केंद्राने गेल्या वर्षी कोकण रेल्वेला फक्त १७ कोटी रुपयांचा निधी दिला. केंद्राकडून झालेल्या या अपुऱ्या मदतीवर कोकणातील खासदारांनी आज तीव्र नाराजी व्यक्त करून निधीत वाढ करण्याची माणगी केली. कोकण रेल्वे प्रकल्पाबाबत आज सीबीडी येथे झालेल्या आढावा बैठकीत कोकणातील खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली.
संपूर्ण कोकण रेल्वेच्या दुपद्रीकरणावर सुमारे ११ हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. विद्युतीकरणाचा खर्च सुमारे एक हजार १०० कोटींच्या घरात जाणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर नव्याने तयार होत असलेल्या रेल्वे स्थानकांवरही कोटय़वधी रुपयांचा खर्च होत आहे. हजारो कोटी रुपयांचे कामे सुरू असताना कोकण रेल्वेसाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी फक्त १७ कोटी रुपयांचा निधी दिला. हा निधी अत्यंत कमी असल्याने त्यावर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा निधी पुढील अर्थसंकल्पात वाढवून मिळावा, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील खासदारांच्या शिष्टमंडळाने आज बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या मुख्यालयाला भेट देऊन कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली आणि सुरू असलेल्या प्रकल्पांच्या स्थितीचा आढावा घेतला. या शिष्टमंडळात शिवसेना खासदार विनायक राऊत, भाजपचे खासदार नारायण राणे यांचा समावेश होता.
कोकण रेल्वेचे विविध प्रश्न, कोकणात जाणाऱ्या दूरपल्ल्याच्या गाड्या रायगड ,रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या , रेल्वे ब्रिज , आरो ब्रिज , ओव्हर ब्रिजचा आदी प्रश्नावर चर्चा करण्यात आली. चिपळूणमध्ये पाणी भरण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबाबतात. त्यांना नियमित थांबा मिळावा , अशी मागणी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी यावेळी केली. रत्नगिरी पर्यतपर्यत सुरु असलेले इलेक्ट्रिफिकेशनचे काम लवकरच पूर्ण करावे . अशा सूचना यावेळी सदस्यांनी दिल्या. सरकार हि नियमित चालत राहणारी प्रक्रिया आहे. केंद्रात आणि राज्यात वेगवेगळे सरकार असले तरी कोकण रेल्वेच्या विकासावर त्याचा परिणाम होऊ देणार नाही , लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमची जबाबदी पार पाडू, असे सुनील तटकरे म्हणाले.
कोकण दर्पण.





