Press "Enter" to skip to content

मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी शिक्षकांपेक्षा अधिक पालकांनी सजग राहायला हवे – डॉ. राहूल भातांब्रे !

पनवेल,कोकण दर्पण वृत्तसेवा : मुले शाळेत फक्त चार ते सहा तास शिक्षकांच्या आणि शाळेच्या सहवासात असतात, परंतु १६ ते १८ तास पालकांच्या सान्निध्यात वावरत असतात. शाळेमध्ये अध्यापन, मूल्यमापन, शारीरिक विकास, बौद्धिक विकास या बाबीकडे लक्ष देत असताना शाळेने ठरवून दिलेल्या बाबी पालकाने काटेकोरपणे पालन केल्यास मुलांचा बौद्धिक विकास हा अधिक चांगल्या प्रकारे होतो. म्हणून मुलांसमोर पालकांनी जबाबदारीपूर्वक वर्तन केले पाहिजे. लहान मुले ही अनुकरणप्रिय असतात. मुलांच्या पुढे पालक जसे वर्तन करतील तसेच मुले करायला शिकतात. उदाहरणार्थ: मुलांच्या पुढे पालक मोबाईलचा अतिवापर करत असतील तर मोबाईल साठी मुलं हट्टी होणारच! मग त्यासाठी मुलांच्या समोर पालकांनी मोबाइल वापरणे शक्यतो टाळलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये आपण मुलांच्या समोर करत असतो. परिणामी मुलांच्या वर्तनामध्ये आपणांस अपेक्षित असलेला सकारात्मक बौद्धिक विकास होत असलेला दिसून येत नाही… आणि म्हणून पालकांनी १६ ते १८ तास आपल्या सहवासात असलेल्या पालकांकडे लक्ष देत असताना शाळा व शिक्षकांकडे पूर्ण जबाबदारी न सोपवता आपणही त्याचे परिपूर्ण पालन केले पाहिजे. शाळा आणि पालक यांच्या संयोगातून मुलांचा बौद्धिक विकास अधिक प्रगल्भपणे होतो. असे मत सुप्रसिद्ध बालविकास व मानसोपचार तज्ञ डॉक्टर राहुल भातांब्रे यांनी राजा प्रसेनजित पब्लिक स्कूल रोहिंजन, तालुका पनवेल, जिल्हा रायगड या शाळेत रोटरी क्लब खारघर यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरादरम्यान “विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास” या विषयावर मार्गदर्शन करताना पालकांना सांगितले. सदर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसाठी सुद्धा निशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये संपूर्ण शारीरिक तपासणीसह बौद्धिक विकास यावर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी प्राचार्य रोहिणी काटकर, उपप्राचार्या स्नेहल तावरे, शितल चव्हाण, काजल फाले, शीला कांबळे, पूजा कांबळे, विलास करडे, अंकुश भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या संचालिका संविधा करडे यांनी वैद्यकीय टीमचे स्वागत केले. तसेच समारोपाप्रसंगी सर्वांचे आभार मानले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »