Press "Enter" to skip to content

देशाच्या बदलत्या समाजकारणात महाविद्यालयीन युवकांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते – प्राचार्य डॉक्टर एस.एच. खान !

कल्याण, कोकण दर्पण वृत्तसेवा : “जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण या धोरणांना अनुसरून आपला देश वाटचाल करत असताना जगातील युवकांच्या तुलनेमध्ये आपल्या देशातील युवकांचे योगदान काय आहे, यावरून आपल्या देशाचे भवितव्य ठरत असते. राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमात सहभागी असलेला प्रत्येक युवाविद्यार्थी हा राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेला असतो. देशातील बदलते राजकारण, बदलते समाजकारण आणि बदललेले अर्थकारण यावर युवा विद्यार्थ्यांनी चिकित्सा करून राष्ट्राच्या भक्कम उभारणीसाठी सजग असायला हवे! महाविद्यालयातील युवा विद्यार्थी हा देशाचा आधारस्तंभ असतो. हे माझे राष्ट्र आहे, मी या देशाचं देणं लागतो… या भावनेतून प्रत्येक विद्यार्थ्याने देशाप्रती आत्मसमर्पण करताना समाजातील वाईट चालीरिती नष्ट करून नव्या पिढीचा एक सक्षम नागरिक म्हणून समाजापुढे आपला आदर्श निर्माण केला पाहिजे.” असे महत्वपूर्ण विचार प्राचार्य डॉक्टर एस. एच. खान यांनी प्रज्ञा करुणा बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित सम्यक संकल्प महाविद्यालय कल्याण आणि मुंबई विद्यापीठ संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मलंगवाडी, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील सात दिवशीय निवासी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना उद्बोधन करत असताना मांडले.
याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सचिन फाळके यांनी, “आपला देश हा कृषिप्रधान देश असून कृषी निगडीत ग्रामीण जीवनाशी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नाळ जोडली पाहिजे. त्यातून राष्ट्राची सुंदर उभारणी होईल.” असे मत मांडले. याप्रसंगी युवकांची शिस्त आणि त्यांची वाटचाल याविषयी मार्गदर्शन केले.
या सात दिवशीय शिबिरामध्ये स्वच्छता अभियान, कचरामुक्त गाव, कचरा निर्मूलन, वनराई बंधारे, अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक जाणीवा आदी उपक्रम व या विषयावर विशेष तज्ञांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. निवासी शिबिरातील सर्व विद्यार्थ्यांना यानिमित्ताने प्रा. रमेश करडे, प्रा. कविता पांडे, प्रा. हेमा फुलवानी, प्रा आशिष मुळे यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी प्रतिनिधी यांनी विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञाद्वारे अभिवचन घेतले आणि मान्यवरांचे आभार प्रा. सोनल गायवळ यांनी मानले. उद्घाटन सोहळा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी प्रा. सुनेत्रा काटेकर आणि प्रा. बी. एन. गायकवाड यांनी प्रयत्न केले.

कोकण दर्पण:

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »