Press "Enter" to skip to content

डाँ. अजित मगदूम यांना महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार !

मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : चंद्रपूर येथे नुकत्याच झालेल्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात प्रा.डाँ. अजित मगदूम यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या सम्मेलनाचे अध्यक्ष डॉ. अभय बंग, सामाजिक न्यायमंत्री प्रा. राजकुमार बडोले यांच्याहस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या डाँ राणी बंग, अभिनेत्री डाँ निशीगंधा वाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
डाँ. अजित मगदूम हे रयत शिक्षण संस्थेच्या नवी मुंबईतील वाशी येथील मॉडर्न महाविद्यालयात अनेक वर्षे इंग्रजीचे प्राध्यापक होते.त्यानंतर ते संस्थेच्या फुंडे( उरण), मलकापूर येथील महाविद्यालयात प्राचार्य होते. परंतु तरुणांमधील वाढती व्यसनाधिनता पाहून ते व्यथित झाले.म्हणून तरुणांमधील व्यसनाधिनता दूर करण्याचे कार्य पूर्णवेळ हाती घेण्याचे त्यांनी ठरविले.त्यासाठी सेवानिवृत्त होण्यास २ वर्षे बाकी असतानाच त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन अनवय प्रतिष्ठाण स्थापन केले. आज त्यांच्या ५ केंद्रांमार्फत व्यसनमुक्तीचे कार्य सुरू आहे. जवळपास ३ हजार तरुणांना व्यसनांच्या दुष्परिणामाबाबत सजग करण्यात आले आहे. डाँ. मगदूम यांचे या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. शासनाच्या या पुरस्कारामुळे आपल्या कार्यास अधिक गती मिळेल,असा विश्वास डाँ. मगदूम यांनी व्यक्त केला.

कोकण दर्पण.