पनवेल , कोकण दर्पण वृत्तसेवा : देशसेवेचे मुखवटे घातलेल्यांचा खरा चेहरा जनतेने ओळखावा, असे प्रतिपादन शेकापचे नेते तथा पनवेल महानगरपालिकेचे विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी खारघर येथे केले.
शेकापचे पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अजित अडसुळे आणि खारघर ग्रामपंचायत माजी सदस्य उषा अडसुळे यांच्या पुढाकाराने विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने खारघर येथे मोफत पासपोर्ट फोटो वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उदघाटन प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रथम म्हात्रे बोलत होते. प्रीतम म्हात्रे पुढे म्हणाले, जनतेला विविध आश्वासने देऊन सत्ता मिळविली, मात्र सत्तेला आल्यानंतर आश्वासने पूर्ण करायला विसरले. सत्ता नसताना जनतेपर्यत पोचणारे खरे काम करणारे कोण हे जनतेला कळून चुकले आहे, असे देखील प्रीतम म्हात्रे म्हणाले.
यावेळी शेकापचे जेष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राम करावकर , खारघर शहर अध्यक्ष अशोक गिरमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राचार्य बी ए पाटील, संतोष गायकर, संतोष तांबोळी , नगरसेवक गुरुनाथ गायकर आदी उपस्थित होते.
अजित अडसुळे आणि उषा अडसुळे यांनी आयोजित केलेल्या सदर आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे प्रीतम म्हात्रे यांनी कौतुक केले.
माजी नगराध्यक्ष तथा शेकापचे नेते जे एम म्हात्रे यांनी देखील सदर कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
कोकण दर्पण.





