Press "Enter" to skip to content

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २८५  व्यापाऱ्यांना मिळणार सिडकोच्या घरांचा लाभ – -आमदार मंदाताई म्हात्रे !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी व्यापार करण्याकरिता १९९५ -९६  साली महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार नवी मुंबई येथे स्थलांतरित झालेले आहेत.स्थलांतरापूर्वी मुंबईमध्ये व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायाच्या जागेसोबतच घरे उपलब्ध करणेबाबतचा सामंजस्य करार महाराष्ट्र शासनाने त्यावेळेस केला होता. परंतु आजतागायत त्यांना घरे उपलब्ध करण्यात आलेली नाहीत. सदरबाबत कृषी उत्पन्न व्यापारी वेल्फेयर असोशिएशनच्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या २८५  सदस्यांना घरे उपलब्ध करण्याकरिता बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची भेट घेऊन सदरबाबत निवेदन दिले. याच अनुषंगाने बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सदर व्यापाऱ्यांसह  राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनीही नगरविकास प्रधानसचिव डॉ. नितीन करीर व सिडको व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांजसह बैठक घेऊन सदर सर्व व्यापाऱ्यांना लवकरात लवकर घरे उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सूचित केल्याची माहिती आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, कृषी उत्पन्न वेल्फेयर असोसिएशनच्या व्यापाऱ्यांनी माझ्या निवासस्थानी भेट घेऊन नवी मुंबईमध्ये घरे उपलब्ध करण्याबाबतचे निवेदन मला सादर केले. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सदर व्यापारी गेल्या 25 वर्षापूर्वी नवी मुंबईमध्ये स्थलांतरित झाले. स्थलांतरापूर्वी मुंबईमध्ये व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना सिडकोच्या सामंजस्याच्या करारानुसार व्यवसाय करणाऱ्या जागेसोबतच घरेही उपलब्ध करणार असल्याचे नमूद केले होते. परंतु कृषी उत्पन्न वेल्फेयर असोसिएशनच्या व्यापाऱ्यांना  व्यवसायाकरिता जागा उपलब्ध केली असून नवी मुंबईत अजूनही घरे उपलब्ध करण्यात आलेली नाहीत. कृषी उत्पन्न वेल्फेयर असोसिएशनच्या285 व्यापाऱ्यांना नवी मुंबईत घरे उपलब्ध व्हावी याकरिता राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांची आज भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सदरबाबत नगरविकास प्रधान सचिव व सिडको व्यवस्थापकीय संचालक यांजसह बैठक घेऊन सदर व्यापाऱ्यांनाही घरे उपलब्ध करणार असल्याचे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सूचित केले.

यावेळी कृषी उत्पन्न वेल्फेयर असोसिएशनचे अध्यक्ष श्री. पांडुरंग घाडेकर, रामदास चास्कर, ऍड .राहुल पवार, वसंत शिंदे, सुनील चांगण, अरुण आढाव तसेच व्यापारी वर्ग उपस्थित होते.

कोकण दर्पण.