Press "Enter" to skip to content

सिडको नोडमधील नागरी सुविधा पूर्णत्वास येईपर्यंत महापालिकेकडे हस्तांतर करू नये – नगरसेवक रवींद्र भगत

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : सिडको नोड मधील नागरी सुविधा जोपर्यंत सिडको पूर्ण करत नाही तो पर्यंत पनवेल महानगरपालिके कडे हस्तांतर करु नये अशी मागणी नगरसेवक रविंद्र अनंत भगत यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी कळंबोली सिडको कार्यालया समोर नगरसेवक रविंद्र अनंत भगत हे १७ जानेवारी रोजी बेमुदत उपोषणाला बसले होते, त्या मध्ये सिडकोने प्रामुख्याने १७ मागण्या मान्य केल्या असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर हे स्टेडियम स्वरुपात बनविणे, साईबाबा आशिर्वाद सोसायटी ते के.एल.ई कॉलेज याठिकाणी मोठा नाला बंधीस्थ करणे, जेणे करुन येथे मच्छर, डास यांचा त्रास होत असल्याने तो नाला बंधीस्थ करण्यात येईल अशा आशयाचे लेखी आश्वासन सिडकोमार्फत पत्राद्वारे कळविले आहे. माथाडी कामगारांसाठी माथाडी भवन असेल, आगरी कोळी बांधवांसाठी आगरी कोळी भवन, जेष्ठ नागरिकांसाठी जेष्ठ नागरिक सभागृह, कलंबोली गावातील नागरिकांसाठी तसेच मुलांसाठी समाजमंदिर व खेळायचे मैदान, आदिवासी बांधवांसाठी आदिवासी समाज हॉल, बौद्ध बांधवांसाठी बौद्ध समाज हॉल, कळंबोली मधील सर्व खेळाडूंसाठी स्पोर्ट्स अकॅडमी, होल्डींग पॉईंट सुशोभीकरण करणे, ज्या कळंबोली मध्ये सिडकोनी घरे बांधली त्या बीओडीपी सोसायटीची पेनेल्टी माफ करणे, सिडको सदनिका हस्तांतर करण्याकरिता अभय योजना राबविणे, तसेच कळंबोलीतील गणेश नगर झोपडपट्टी पुनर्वसन करण्यात यावे. तसेच सेक्टर १, १ ई मधील नागरिकांसाठी जो प्लॉट आहे त्या ठिकाणी उद्यान किंवा गाड्या पार्किंग साठी पे अँड पार्क साठी ही जागा उपलब्ध करुन घ्यावे अश्या विविध मागण्यांसाठी नगरसेवक रविंद्र भगत हे उपोषणाला बसले होते, यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे जोपर्यंत सिडको प्रशासन या मागण्या पूर्ण करीत नाहीत तोपर्यंत कळंबोलीमधील विविध प्रश्न असलेले विभाग पनवेल महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात येऊ नयेत. यासाठी नुकतेच नगरसेवक रवींद्र भगत यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देऊन ही बाब निदर्शनास आणून देत हस्तांतर करण्यात येऊ नये म्हणून विनंती केली आहे. यावेळी निवेदन देताना पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक बबन मुकादम, शशिकांत शेळके आदी उपस्थित होते.

कोकण दर्पण.