Press "Enter" to skip to content

नवी मुंबई , पनवेल मध्ये प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष !

नवी मुंबई – पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात महापौर जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., सभागृह नेता रविंद्र इथापे, परिवहन समिती सभापती रामचंद्र दळवी, स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समिती सभापती नेत्रा शिर्के, नगरसेवक अविनाश लाड, डॉ. जयाजी नाथ, सरोज पाटील, सलुजा सुतार, अतिरिक्त आयुक्त रविद्र पाटील व महावीर पेंढारी, ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी प्रथमत:च आयकॉनीक वास्तू म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीच्या प्रांगणात तळमजल्यावर ध्वजारोहण संपन्न झाले. त्यामुळे विविध वयोगटातील नागरिकांची याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याप्रसंगी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना महापौर श्री. जयवंत सुतार यांनी राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आजपासून 10 फेब्रुवारीपर्यंत लोकशाही पंधरवडा साजरा होत असून यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लोकशाही, निवडणूक व सुशासन याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगितले. नवी मुंबई हे सर्वांना समानतेच्या एकाच धाग्याने बांधणारे शहर असून सर्व नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच राहण्यायोग्य शहरात देशात व्दितीय क्रमांकाचे व स्वच्छतेत नेहमीच अग्रभागी राहिले असल्याचे ते म्हणाले. सर्व मतदारांनी व विशेषत्वाने 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांनी आपले मतदानाचे कर्तव्य बजावून लोकशाही बळकट करावी असे आवाहन महापौरांनी याप्रसंगी केले. सतत नवीन उपक्रम राबविणारी महानगरपालिका म्हणून नवी मुंबईचा नावलौकीक असून आज शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थी पालकांसाठी ॲप व दिव्यांग व्यक्तींसाठी ऑनलाईन नोंदणी प्रणाली सुरु होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आपल्या मनोगतात नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना व पालकांशी संवाद साधण्यासाठी ‘NMMC Edu Smart’ हे मोबाईल ॲप अतिशय लाभदायी ठरेल असा विश्वास व्यक्त करीत त्यासोबतच दिव्यांग व्यक्तींना त्यांच्यासाठी सुरु असलेल्या कामांची तसेच योजनांची माहिती त्याचप्रमाणे दिव्यांग नोंदणी प्रमाणपत्रासाठी आवश्यक गोष्टी अशी महत्वाची माहिती सहज उपलब्ध करून देणारी “स्वीकार (Sweekar)” ही ऑनलाईन दिव्यांग नोंदणी प्रणाली घरबसल्या माहिती उपलब्ध करून देणारी असल्याने त्यांना यासाठी होणारा त्रास कमी करणारी आहे व अशा सुविधा देणारी नवी मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे याबद्दल समाधान व्यक्त केले. महानगरपालिकेच्या वतीने लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत असून यानिमित्त मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

विद्यार्थी पालक सुसंवादात्मक ‘NMMC Edu Smart’ अभिनव मोबाईल ॲपचा शुभारंभ

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी पालकांशी कायम सुसंवाद रहावा यादृष्टीने सध्याच्या स्मार्ट फोन प्रेमी युगात ‘NMMC Edu Smart’ या अभिनव मोबाईल ॲपचा शुभारंभ महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ॲपव्दारे पालकांना आपल्या विद्यार्थ्याची शाळेतील उपस्थिती, प्रगती, परीक्षेचे वेळापत्रक आदी माहिती सहज उपलब्ध होणार आहे. याशिवाय शाळेमार्फत दिल्या जाणा-या सूचना, विविध परिपत्रके, परीक्षेचा निकाल, पालक सभा अशा विविध प्रकारची माहिती मिळणार आहे. त्याचप्रमाणे पालकही आपल्या सूचना यावर नोंदवू शकतात. अशारितीने पालकांना शाळेशी जोडणारे हे विशेष ॲप विद्यार्थी पालक आणि शाळेचा थेट संवाद घडवून आणून शैक्षणिक विकासात सर्वांचा सहयोग घेणारे असल्याची माहिती शिक्षणाधिकारी श्री. संदीप संगवे यांनी दिली.

दिव्यांग व्यक्तींना माहितीप्रद “स्वीकार (Sweekar)” ऑनलाईन नोंदणी प्रणालीचा शुभारंभ

त्यासोबतच देशभरात नावाजल्या जाणाऱ्या महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा-सुविधा केंद्राच्या अभिनव अशा “स्वीकार (Sweekar)” या दिव्यांग नोंदणी प्रणालीचाही याप्रसंगी शुभारंभ संपन्न झाला. www.sweekar.in या प्रणालीव्दारे दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यास सहाय्य होणार आहे तसेच दिव्यांगांकरीता राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याव्दारे नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींची एकत्रित माहिती संकलीत होणार असून त्याचा उपयोग दिव्यांगांकरीता विविध प्रकारचे सेवाभावी काम करण्यासाठी होणार असल्याचे इटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांनी सांगितले.

महापालिका मुख्यालयाप्रमाणेच विभाग कार्यालये, रुग्णालये याठिकाणीही महापालिका पदाधिकारी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २५ ते २७ जानेवारी या काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयकॉनिक मुख्यालयास तिरंगी रंगात रोषणाई करण्यात आली असून नागरिक मुख्यालय इमारतीसोबत तसेच २२५ फूट उंच राष्ट्रध्वजस्तंभासोबत सेल्फी छायाचित्रे काढण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
कोकण दर्पण.